Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोदींसमोर कौतुक झालेल्या ‘या’ जिल्ह्यानं वाढवली मुख्यमंत्र्यांची चिंता

5

हायलाइट्स:

  • अहमदनगर जिल्ह्यात करोना संसर्गाचे चित्र पालटले
  • दैनंदिन रुग्णसंख्येतील वाढ ८०० च्या घरात
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्यक्त केली चिंता

अहमदनगर: मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरणाची संधी मिळालेल्या आणि कौतुक झालेल्या अहमदनगर जिल्ह्याची आता सर्वांनाच काळजी वाटू लागली आहे. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रविवारी रात्री सोशल मीडियातून राज्याला संबोधित करताना ज्या जिल्ह्यांबद्दल काळजी व्यक्त केली, त्यात अहमदनगरचा समावेश आहे. हिवरे बाजार पॅटर्न पुढे करून त्यावेळी राज्याला नव्हे तर देशाला दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त झालेल्या जिल्ह्याचे चित्र आता उलटे झाले आहे. (Corona Positivity Rate in Ahmednagar)

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील करोनाची स्थिती सुधारत आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक निर्बंध शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. काही घोषणा झाल्या असून आणखी काही होणार आहेत. त्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर अनेक ठिकाणी बऱ्याच सवलती मिळण्याची शक्यता आहे. असे असताना अहमदनगरसह काही जिल्ह्यांना मात्र त्या मिळण्याची शक्यता धूसर आहे. कारण या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत नसल्याने त्यांची वेगळी यादी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्याला संबोधित करतानाही याचा उल्लेख केला. पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या जिल्ह्यांमध्ये आजही काळजी घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे नव्याने काही सवलती मिळाल्या तरी त्या या जिल्ह्यांत लागू होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

वाचा: ह्याला उलट्या खोपडीचं राजकारण म्हणतात; संजय राऊत भाजपवर भडकले

यातील अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीत उलटा अनुभव येत आहे. कारण पूर्वी या जिल्ह्यातील कामाचा गौरव झाला होता. २० मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी देशातील ११ राज्यांतील साठ जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये अहमदनगरचा समावेश होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आदर्श गाव हिवरे बाजारने राबविलेल्या पॅटर्नचीही त्यांनी माहिती दिली. हाच पॅर्टन जिल्हाभर राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी नगरमधील करोनाची स्थितीही सुधारताना दिसत होती. त्यामुळे हिवरे बाजारची यशोगाथा आणि जिल्ह्यातील कामाचे कौतुक झाले होते. बैठक संपताच स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून कौतुक केले होते. जिल्ह्यात करत असलेले काम यापुढेही सुरू ठेवावे, असे आवाहन केले होते.

वाचा: ‘मुख्यमंत्र्यांनी लोकल प्रवासाचा सोपा प्रश्न अवघड केला’

त्यानुसार बैठका झाल्या. हिवरे बाजारमध्ये करोनामुक्तीचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या पोपटराव पवार यांचे ऑनलाइन मार्गदर्शन ठेवण्यात आले. हा पॅटर्न इतर गावांत राबविण्यासाठी गावांनी आणि प्रशासनानेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून झाले. प्रत्यक्षात मात्र, काही मोजकी गावे वगळी तर इतर ठिकाणांहून याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडतच गेली. गावपुढाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कोठे लोकांची साथ मिळाली नाही, तर कोठे प्रमुख लोकप्रतिनिधीच राजकीय कार्यक्रम घेत सुटले. त्यामुळे ग्रामस्थही नियम मोडू लागले. विवाह, साखरपुडा, वाढदिवस असे कार्यक्रम जोरदारपणे साजरे होऊ लागले. यात्रा-जत्राही भरल्या. त्यामुळे ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढत गेला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन उघड्या डोळ्यांनी हे पाहात होते. विशिष्ट तालुक्यांमध्येच संसर्ग अधिक वाढत होता. वरिष्ठ पातळीवरून दखल घेतल्यानंतर काही भागात कडक निर्बंध लावण्यात आले.

वाचा: ‘मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावं यासाठी आता कोर्टात याचिका करायची का?’

मात्र, या गडबडीत जिल्ह्याची परिस्थिती बिघडत गेली. मे महिन्यातील कौतुकानंतर जून महिना बरा केला. जुलैपासून परिस्थिती बिघडत गेली. जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटीव्हिटी रेट साडेपाच ते सहा टक्के आहे. आतापर्यंतचा पॉझिटीव्हिटी रेट तेरा ते चौदा टक्के आहे. दैनंदिन रुग्ण संख्या ७०० ते ८०० च्या दरम्यान आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढून सहा हजारांवर गेली होती. अलीकडे त्यात किंचित सुधारणा होत आहे.

हिवरे बाजार पॅटर्नबद्दल प्रशासनाच्या सूचनेनुसार आम्ही वेळोवेळी महिती दिली. गावांनी आणि प्रशासनाने ती गांभीर्याने घ्यायला हवी होती. आमच्या गावात मात्र त्यात हयगय केली जात नाही. त्यामुळे शाळेसह बहुतांश व्यवहार पूर्वपदावर आले असले तरी गावात तीन महिन्यांत एकही रुग्ण नाही.

पोपटराव पवार, हिवरे बाजार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.