Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे- बेंगलुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी

11

पुणे, दि. २: पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ २३ एप्रिल रोजी पहाटे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल बसच्या अपघाताच्या अनुषंगाने अपघाताची कारणे आणि अपघात टाळण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताच्या संभाव्य कारणांबाबत परिवहन विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतचा संपूर्ण रस्ता उताराचा असल्याने इंधन वाचविण्याच्या प्रयत्नात न्यूट्रलमध्ये वाहन चालविण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती असते. यातून वाहनांचा वेग वाढतो. वाहनाला सतत ब्रेक लावल्यामुळे ब्रेकमध्ये अनावश्यक उष्णता व दाब निर्माण होऊन तत्कालीन स्थितीत ब्रेक काम करेणासे होतात. हेदेखील अपघातांचे महत्त्वाचे कारण ठरू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.

*जड वाहनांची वेगमर्यादा घटविणे आवश्यक*
कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा घटवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. त्याअनुषंगाने ट्रक मालक संघटनांसोबत बैठक घेण्यात यावी, असे निर्देष जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

एनएचएआय, पोलीस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह सेव्ह लाईफ फाऊंडेशन संस्थेने सुचविलेल्या विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका
या अनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांतर्गत तसेच कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस चौकी स्थापन करणे, त्या ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पीएएस) कार्यान्वित करणे, स्वामी नारायण मंदिर ते दरी पूल दरम्यान वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलरची संख्या वाढवणे, तातडीचे मदत देण्यासाठी पोलीस चौकीजवळ क्रेन तैनात ठेवणे, दरी पुलाजवळ सेवा रस्त्याला जड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी हाईट बॅरिकेट्स बसवणे आदी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

नियम तोडणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी 2 इंटरसेप्टर वाहने
राष्ट्रीय महामार्गाच्या या लांबीत वाहतूक नियमांचे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना तातडीने रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेला एक आणि ग्रामीण पोलीसांना एक अशी दोन इंटरसेप्टर वाहने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याबाबत तातडीने प्रस्ताव द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन करावयाच्या उपाययोजनांतर्गत कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्याअनुषंगाने लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री यांची बैठक होणार असल्याचे एनएचएआयचे प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी सांगितले.

वाहन चालविताना ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्याचा पर्याय उपलब्ध होण्याच्यादृष्टीने इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण तयार करणेही उपयुक्त ठरेल, असेही यावेळी सुचविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.