Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आक्रमक झालेल्या चंद्रकांत पाटलांनी अशोक चव्हाण यांना दिलं थेट आव्हान

15

हायलाइट्स:

  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
  • मराठा आरक्षणावरून केली जोरदार टीका
  • अशोक चव्हाण यांना दिलं थेट आव्हान

कोल्हापूर : ‘राज्याच्या अधिकारातील कामे पूर्ण करण्याच्या ऐवजी सातत्याने केंद्रावर आरोप करता तर तुमच्या सरकारला मराठा समाजाला खरोखरच आरक्षण द्यायचं आहे का नाही, ते तरी आता स्पष्ट सांगा,’ असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दल निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला आहे. त्यामुळे मुळात मराठा समाज मागास असल्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल नव्याने मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही. ५० टक्क्यांच्या मर्यादेचा मुद्दा हा त्यानंतर येतो. राज्य सरकारच्या पूर्णपणे हातात असलेल्या या मुख्य जबाबदारीबद्दल काहीही न करता सतत नव्या सबबी सांगणे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरू आहे.

Uddhav Thackeray: राज्यासाठी लॉकडाऊनचा निकष ठरला!; CM ठाकरे यांचा मोठा निर्णय

‘महाविकास आघाडी आरक्षण टाळण्याचा प्रयत्न करत आहे’

‘महाविकास आघाडी सरकार मराठा समाज मागास असल्याचा अहवाल मिळवून त्याच्या आधारे कायदा करण्याचा त्यांच्या अधिकारातील टप्पा गाठेल त्याचवेळी त्यांना बाकी मुद्दे मांडण्याचा नैतिक अधिकार असेल. पहिल्या इयत्तेतील मुलगा पुढे दहावीत नापास होणार असेल तर त्याने शिकूच नये, असा अशोकरावांचा सध्याचा पवित्रा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करताना १०२ व्या घटनादुरुस्तीबाबत जो अर्थ लावला त्यामुळे एखाद्या जातीला मागास ठरविण्याचा अधिकार राज्यांना नाही तर केंद्राला आहे असे चित्र निर्माण झाले. त्याबाबत केंद्र सरकारने राज्यांना अधिकार आहे असे स्पष्ट करणारी घटनादुरुस्ती केली. आता राज्याकडे अधिकार आला याचा आनंद मानून महाविकास आघाडी सरकार नव्या जोमाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काम सुरू करेल असे वाटत होते. परंतु, हे सरकार काही तरी करून आरक्षण टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळेच अशोक चव्हाणांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की नाही हे एकदा स्पष्ट करावं,’ अशा आक्रमक शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे.

‘देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भाजपा सरकारने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यावेळी इंदिरा साहनी खटल्यातील पन्नास टक्क्यांची मर्यादा होतीच. पण त्यातील अपवादात्मक स्थितीच्या मुद्द्याच्या आधारे फडणवीस सरकारने हे आरक्षण दिले आणि ते हायकोर्टातही टिकवले. महाविकास आघाडी सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात योग्य रितीने बाजू मांडली असती तर आरक्षण टिकले असते, याचीही अशोक चव्हाण यांनी जाणीव ठेवावी,’ असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.