Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राज्यातील शालेय शिक्षकांची संचमान्यता आता १५ मे रोजी अंतिम केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्याने ही संचमान्यता रखडली होती. मात्र, आता शिक्षण विभागाने संचमान्यता अंतिम करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानंतर राज्यातील शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये प्रत्यक्षात शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढली जाण्याची शक्यता आहे.
करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सन २०१९-२० या वर्षानंतर शाळांच्या संचमान्यता बदलण्यात आल्या नाहीत. करोनानंतर अनेक भागांतील विद्यार्थी स्थलांतरित झाले आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या संख्येत बदल झाला आहे. परिणामी प्रत्यक्ष विद्यार्थिसंख्या निश्चित करण्यासाठी ‘आधारवैध’ विद्यार्थीसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांची ‘आधार’सह माहिती सरल प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या विद्यार्थी संख्येवरच सन २०२२-२३ वर्षाची संचमान्यता निश्चित केली जाणार आहे. राज्यातील सरकारी, खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची आधारसह माहिती ३० नोव्हेंबरपर्यंत सरल प्रणालीवर भरण्याचे आदेश शिक्षण विभागाने गेल्या वर्षी दिले होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नव्हते.
काहींच्या आधार कार्डातील माहितीमधील विसंगती, तर काहींचे आधारकार्ड काढताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आधार जोडणीतील या विविध अडथळ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांची माहिती सरल प्रणालीवर नोंदविण्यात आली नव्हती. परिणामी संचमान्यतेसाठी शिक्षण विभागाने वांरवार मुदत दिली होती. त्यानुसार, ३० एप्रिलला संचमान्यता अंतिम करण्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले होते.
मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थ्यांची आधारची माहिती जुळत नसल्याची स्थिती आहे. त्यातून संचमान्यतेसाठी अडचणी येत आहेत. त्यातून आता अंतिम संचमान्यता १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
शाळास्तरावर काम सुरू
आधारकार्डच्या जोडणीचे काम शाळास्तरावर सुरू आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संचमान्यता १५ मे रोजी अंतिम केली जाणार आहे. शिक्षण विभागाकडून संचमान्यतेचे शाळानिहाय वितरण २० मेपर्यंत केले जाणार आहे. त्यानंतर शाळांना ३० जूनपर्यंत बिंदूनामावली निश्चित करावी लागणार आहे.
शिक्षण विभागाने ३० एप्रिलपर्यंत केलेली संचमान्यता तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे. आता १५ मेपर्यंत अंतिम संचमान्यता केली जाणार आहे. शाळांनी त्यानुसार नियोजन करून सर्व विद्यार्थ्यांच्या आधारची माहिती सरल प्रणालीवर नोंदवावी. त्यातून कोणाचेही नुकसान होणार नाही.
महेंद्र गणपुले, प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ
अशी असेल प्रक्रिया
– विद्यार्थ्यांच्या आधारजोडणीचे काम शाळा स्तरावर सुरू
– कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संचमान्यता १५ मे रोजी अंतिम केली जाणार
– शिक्षण विभागाकडून संचमान्यतेचे शाळानिहाय वितरण २० मेपर्यंत होणार
– शाळांना ३० जूनपर्यंत बिंदुनामावली निश्चित करावी लागणार
– शाळा व्यवस्थापनांना पहिल्या तिमाहीसाठी शिक्षकभरतीच्या पोर्टलवर १५ जुलैपर्यंत रिक्त पदे नोंदवावी लागणार
– त्यानंतर रिक्त पदांसाठी जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, तसेच नियुक्तीसाठी शिफारस करणे आदी प्रक्रिया २० ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागणार