Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणै,दि.०९:- : ‘स्पर्धा परीक्षा’ देऊन सरकारी नोकरीत जाणं, हाच आयुष्याला कलाटणी देण्यासाठीचा मंत्र असं वाटणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यातही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा ओघ लक्षणीय आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणं आणि ती यशस्वीरीत्या पास करणं हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो. काहींना यश मिळते तर काहींना अपयश. वारंवार अपयश आल्यानं आपलं आयुष्य संपवण्यापर्यंतचे टोकाचे पाऊलही काही जण उचलतात. या स्पर्धेमुळं उभे राहणारे अनेक सामाजिक प्रश्नही मोठे आहेत. यावर भाष्य करणारा सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित-निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘मुसंडी’ हा मराठी चित्रपट येत्या २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कोणतेही ध्येय गाठण्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. यासाठी योग्य मार्ग निवडला आणि मग तो मार्ग काढण्यासाठी मेहनत घेणे यातच यशाचे रहस्य लपलेलं असतं. स्पर्धेमध्ये अपयश आल्याने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागण्याची जिद्दच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवेल, हा संदेश पोहचवणारा ‘मुसंडी’ हा चित्रपट प्रत्येकाला आपल्यातल्या आत्मविश्वासाची जाणीव करून देईल, असा विश्वास दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी व्यक्त केला.
रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी ‘मुसंडी’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी), सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे, राम गायकवाड, अजित पवार, उत्कर्ष देशमुख, सार्थक वाईकर, आर्यन पवार, निमिशा सानप, रुचिता देशमुख, प्रियंका पवार, ऐश्वर्या फटांगरे, श्रद्धा गायकवाड, सोनाली गायकवाड, आकांक्षा कापे, प्राजक्ता गायकवाड, मानसी डरंगे, भाग्यश्री पवार यांच्या भूमिका आहेत.
एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा अमुक एक ‘पॅटर्न’ नसतो. तीव्र इच्छाशक्ती, ध्येय गाठण्यासाठी अथक मेहनत, अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभं राहून कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण असतील तर यशाची ‘मुसंडी’ मारता येऊ शकते हे दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी रंजनासोबत अंजनाचे ही काम करेल हे नक्की.
‘