Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- महापुराने कंबरडं मोडलेल्या छोट्या व्यावसायिकांना सरकारचा दिलासा
- पूरग्रस्त भागात जिल्हा बँका देणार कमी व्याजदराने कर्ज
- पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना होणार फायदा
महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्रात अडीच हजार कोटींचा दणका बसला. कोकणात देखील हजार कोटीपेक्षा अधिक नुकसान झाले. अनेक गावांना महापुराच्या पाण्याने वेढल्याने घरे, दुकाने, टपरी बुडाली. हजारो हेक्टर उभ्या पिकात पाणी साचल्याने पिकांचा चिखल झाला. यामुळे सर्वसामान्य लोकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून सरकारच्या वतीने दहा हजार रूपये देण्यात येत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना हेक्टरी मदत करण्यात येणार आहे.
सरकारच्या वतीने पात्र बाधितांना आर्थिक मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. यामुळे दुकानदार, टपरीधारकांना मोठी मदत होणार आहे. नुकसानीच्या मानाने मदत कमी मिळणार असल्याने आणि नव्याने पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणखी आर्थिक मदत लागणार असल्याने आता जिल्हा बँका मदतीला धावून आल्या आहेत.
राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला आहे. ना-नफा तत्वावर अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा राज्यातील अतिवृष्टी व पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना होणार असून त्यांना केवळ ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकांचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते.