Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘नॅक’ मूल्यांकन हे प्रत्येक महाविद्यालयासाठी अत्यंत महत्वाचे असते. या समितीकडून मूल्यांकन झाल्यानंतर उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना ग्रेड दिली जाते. ज्याद्वारे पुढे अनुदान आणि इतर विशेष अभ्यासक्रम अनुदानाचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालय असो व विद्यापीठ हे आपल्या शिक्षण संस्थेला ‘नॅक’ मूल्यांकनात A++ दर्जा मिळवून देण्यासाठी धडपडत असतात. यंदा याच नॅक मूल्यांकनात आपला महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवर आहे. या वर्षात राज्यातील जवळपास १ हजार ९५७ शिक्षण संस्थांचे मूल्यांकन ‘नॅक’ (NAAC – National Assessment and Accreditation Council) कडून करण्यात आले आहे. यामध्ये ३५ विद्यापीठे आणि १ हजार ९२२ महाविद्यालयांचा समावेश आहे.
‘नॅक’ मूल्यांकनाच्या श्रेणीवरून कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेचा दर्जा ठरत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्था यांचे नॅक मूल्यांकन होणे अतिशय गरजेचे आहे. पण ‘नॅक’ मूल्यांकन ही प्रक्रिया प्रचंड अवघड, क्लिष्ट आणि अवघड असते. त्यामुळे अनेक शिक्षण संस्था याकडे दुर्लक्ष करतात किंवा मूल्यांकन करण्यास टाळत असतात. पण महाराष्ट्र मात्र याला अपवाद ठरला आहे. महाराष्ट्रामध्ये यंदासर्वाधिक शिक्षण संस्थांचे मूल्यांकन झाले आहे.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ (NEP 2020 -New Education Policy) मध्ये नमूद केल्याप्रमाणे उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकन प्रक्रियेत काही महत्वाचे बदल प्रस्तावित आहेत. मात्र ही नवी पद्धती प्रत्यक्षात अंमलात येईंपर्यंत नॅक मूल्यांकन प्रक्रिया सर्वच शिक्षण संस्थांना बंधनकारक आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील महाविद्यालये, विद्यापीठांनी नॅक मूल्यांकन करून घेण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर त्याचे फलितही समोर आले.
(वाचा: Independence Day 2023: ‘स्वातंत्र्य दिन’ आणि ‘प्रजासत्ताक दिन’ यातला नेमका फरक काय? ‘या’ गोष्टी कधीही विसरू नका)
‘नॅक’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या मे २०२३ च्या आकडेवारीनुसार, नॅक मूल्यांकन केलेल्या सर्वाधिक म्हणजे १ हजार ९५७ उच्च शिक्षण संस्था महाराष्ट्रात आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक असून तेथील १ हजार २८ शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन केले आहे. तर तमिळनाडूतील ९०४ संस्थांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
‘नॅक’ मूल्यांकन केलेल्या देशातील उच्च शिक्षण संस्थांची आकडेवारी…
- विद्यापीठे : ४३०
- महाविद्यालये : ९,२५७
- एकूण : ९,६८७
‘नॅक’ मूल्यांकन केलेल्या देशातील शिक्षण संस्थांची सविस्तर आकडेवारी…
- राज्ये : विद्यापीठे : महाविद्यालये : एकूण
- महाराष्ट्र : ३५ : १,९२२ : १,९५७
- कर्नाटक : ३४ : ९९४ : १,०२८
- तमिळनाडू : ४५ : ८५९ : ९०४
- उत्तर प्रदेश : ३९ : ६१७ : ६५६
- गुजरात : २७ : ५०० : ५२७
- पश्चिम बंगाल : १७ : ४११ : ४२८
(वाचा: Vishwas Nangare patil: स्पर्धा परीक्षा देताय? मग विश्वास नांगरे पाटलांचा ‘हा’ कानमंत्र डोक्यात फिट्ट करा..)