Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणुकांना लाल कंदील; अचानक मिळालेल्या स्थगितमुळे विद्यार्थी संघटना संतप्त
९ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. पण, अवघ्या दहा दिवसाच्या आतच सिनेट निवडणूका स्थगितीचा निर्णय घेण्यात आला आहे. काल (१७ ऑगस्ट २०२३) ला पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाची माहिती सांगणारे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उमेदवार अर्ज भरण्याची आज शुक्रवार, १८ ऑगस्ट २०२३ ही अंतिम तारीख होती. निवडणुकांसाठी विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १० सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. तर, १३ सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र अचानक या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे.
राजकीय पक्षांबरोबरच विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रम निवडणुकांचा जाहीर झाल्यानंतर त्यानुसार रणनीती आखली होती. मात्र सिनेट निवडणुकीला स्थगितीच्या रूपात लाल कंदील दाखवल्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थगितीचे कारण अस्पष्ट…
मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली. मात्र, हा निर्णय का घेतला, याची माहिती विद्यापीठाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात दिली नाही. याव्यतिरिक्त, माध्यमांनाही याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नसल्यामुळे या निर्णयावरून विविध चर्चाना उधाण आले आहे.
विद्यार्थी संघटनांची टीका
“निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक असल्याची टीका ठाकरे गटाचे युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केली आहे.
तर, सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षांच्या युवा आघाडी आणि विद्यार्थी आघाडीची तयारी नसल्यामुळे आणि या निवडणुकीमध्ये आपला पराभव हा निश्चित आहे हे लक्षात आल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाने हा रडीचा डाव खेळला असल्याचा आरोप छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे राज्यअध्यक्ष रोहित ढाले यांनी केला आहे.
असे होते विद्यापीठ निवडणुकीचे वेळापत्रक :
- या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करता येणार होता
- तर २१ ऑगस्ट सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडणार होती. उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे अपील करण्यास २३ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती.
- २५ ऑगस्ट सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात देण्यात आली होती.
- १३ सप्टेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार होणार होती
परंतु, १७ ऑगस्टला विद्यापीठाच्या निवडणुकांना पुढील आदेशापर्यत स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.