Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
९६३ वर्षांपूर्वीचे शिवमंदिर
अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे.अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते. या ठिकाणाचे मूळ नाव ‘आम्रनाथ’ असे होते, ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले. या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव पडला आहे, असे सांगितले जाते. हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते. मात्र, काही अभ्यासकांच्या मते, अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे. हे एकच भूमिज मंदिर आहे, ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे, असे म्हटले जाते.
घरात उजव्या सोंडेचा गणपती स्थापन करावा का? वाचा, शास्त्र व मान्यता
अंबरनाथ शिवमंदिराची रचना
देशातील बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे. गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभार्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे.
मनमोहक परिसर
सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत, अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरली आहेत. मंडपाच्या खांबांवर अंत्यत कोरीव अशा मूर्ती आहे. या भिंतीवर एकूण ७० अशा प्रतिमा कोरल्या आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत. तसेच मंदिराचा परिसरही अतिशय मनमोहक असल्याचे म्हटले जाते. या मंदिराजवळ एक गुहा असून, ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते.
पर्यटकांसाठी पर्वणी
केवळ मुंबई, महाराष्ट्रातील नाही, तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले. मात्र, कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते. मात्र, याला आधार असल्याचे दिसून येत नाही. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात.