Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
यंदा मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन/ संस्थात्मक/ विभागीय सांस्कृतिक युवा महोत्सवाचे हे ५६ वे वर्ष. यंदाच्या वर्षीही विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक महाविद्यालये आणि विभागांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. आता हा महाेत्सव अंतिम फेरीकडे आला आहे. मंगळवार २९ ऑगस्ट २०२३ रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते महोत्सवाच्या अंतिम फेरीचे उदघाटन झाले.
(वाचा: RRC Central Railway Apprentice Recruitment 2023: भारतीय रेल्वेमध्ये २ हजारांहून अधिक पदांची भरती! आजच करा अर्ज..)
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड, अभिनेते ओंकार भोजने, तालवादक विजय जाधव, ललित कलाकार डॉ. बालाजी भांगे, चित्रपट व मालिका लेखक चेतन सैन्दाणे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक निलेश सावे यांच्यासह कला-नाट्य यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या उद्धाटन सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन, अथक प्रयत्न आणि भरपूर सराव करण्याचा मोलाचा सल्ला पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर यांनी दिला. कलेच्या क्षेत्रात असलेली आवड जोपासण्यासाठी महाविद्यालयीन जीवनात खूप सराव केला असल्याचे त्यांनी सांगितले. परिंदा चित्रपटातील “तुमसे मिलके ऐसा लगा…” या गीत गायनांने त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सात जिल्ह्यातील विविध बारा परिक्षेत्रात दिनांक १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२३ या दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जवळपास ३४२ हून अधिक महाविद्यालयांतील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, वांड्मय आणि ललीत कला या एकूण पाच कला प्रकारातील विविध ४१ स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. प्राथमिक फेरीतील विजेत्यांचे अंतिम फेरीसाठी झालेल्या निवडीचे सादरीकरण हे ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. यामधून जे विजेते होतील त्यांची निवड चाचणी करून संघ तयार करून पुढे तो संघ राज्यस्तरीय, पश्चिम क्षेत्र आणि देश पातळीवरील आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
(वाचा: MMB Mumbai Recruitment 2023: ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’त एक लाखाहून अधिक पगाराची नोकरी! जाणून घ्या भरतीचे तपशील..)