Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे महानगरपालिका आयोजित ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उत्साहात.शेकडो विद्यार्थ्यांनी लुटला विविध गेमचा आनंद
पुणे दि. ०८ सप्टेंबर २०२३ : मुळा मुठा नदीच्या किनारी शुक्रवारी (८ सप्टेंबर) रोजी पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेला ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उत्साहात पार पडला. नदी किनारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले विविध गेम व अचानक आलेला रिमझिम पाऊस, यामुळे महाविद्यालयीन तरुणाईचा उत्साह द्विगुणीत झाला. यावेळी ‘माझ पुणे, आम्ही पुणेरी’ अशा घोषणांनी परिसर दुमदूमला होता. रिल्स स्टार अथर्व सुदामे हा या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मचाले यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत येरवडा ब्रिज ते संगमवाडी ब्रिज दरम्यान गणपती विसर्जन घाटाजवळ ३०० मीटरचा सॅम्पल स्ट्रेच तयार करण्यात आला आहे. हा सॅम्पल स्ट्रेच नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला असून सर्वात प्रथम तो महाविद्यालयीन तरुणांना पाहता यावा, या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’चे आयोजन शुक्रवारी सकाळी ७ ते सकाळी १० यावेळेत सॅम्पल स्ट्रेचवर करण्यात आले होते. या फेस्टला महाविद्यालयीन तरुणांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.
‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’मध्ये सुरुवातीला महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये प्रकल्पाचे उद्देश, प्रकल्पाचे नागरिकांना होणारे फायदे आदींबाबत सविस्तर माहिती दिली. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाविषयी माहिती घेण्यासोबतच विद्यार्थ्यांनी याठिकाणी विविध खेळांचा आनंद घेतला. याप्रसंगी विविध गाण्यांवर महाविद्यालयीन तरुणाई येथे थिरकताना दिसली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनीही विविध खेळांमध्ये सहभागी होत तरुणाईचा उत्साह वाढवला. यावेळी सॅम्पल स्ट्रेचवर सेल्फी काढण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. मुळा मुठा नदी किनारी करण्यात आलेला सॅम्पल स्ट्रेच पाहून अनेकांनी अशा प्रकारे नदीचा किनारा हा सर्वत्र व्हावा, अशा भावनाही व्यक्त केल्या. तसेच अनेकांना या सॅम्पल स्ट्रेचचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्याचा मोह आवरता आला नाही.
अथर्व सुदामे सोबत तरुणाईचे एन्जॉय
पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’मध्ये रिल्स स्टार अर्थव सुदामे हा देखील सहभागी झाला होता. त्याच्यासोबत महाविद्यालयीन तरुणाईने विविध गेममध्ये सहभागी होत चांगलाच आनंद लुटला. याप्रसंगी अथर्व सुदामे म्हणाला की, ‘प्रथमच मी इतका सुंदर व छान असा मुळा मुठा नदीचा काठ पाहत आहे. येथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. पुणे महानगरपालिकेने केलेले हे काम खूपच छान आहे.’
म्हणून आयोजित केला होता विशेष कार्यक्रम
मुळा मुठा नदी किनारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यामागील संकल्पना देखील यावेळी महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली. मुळा मुठा नदीचा किनारा किती सुंदर दिसू शकतो, महानगरपालिका यासाठी कसे प्रयत्न करीत आहेत, हे विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे यावेळी सांगण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थी व नदी यांच्यातील नाते अधिकच दृढ होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांनी याप्रसंगी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी काळात नागरिकांसाठी अशाच पद्धतीने नदी किनारी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशीही माहिती दिली.
शाळकरी विद्यार्थ्यांनी जिंकली मने
मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अनुषंगाने सेंट फ्रान्सिस डीसेल्स स्कूल, विमाननगर या विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी एकत्र येत ‘माझी मुळा मुठा’ हे गाणे तयार केले आहे. हे गाणेही यावेळी लाँच करण्यात आले. या गाण्याचे अनेकांनी कौतुक केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी हे गाणे तयार केले आहे, त्यासर्वांनी ते व्यासपिठावर जाऊन गायल्याने या मुलांनी उपस्थितांची मने जिंकली.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाविषयीचा माहितीपट प्रसिद्ध
मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाविषयी परिपूर्ण माहिती असणारा माहितीपट देखील आज, शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून नदी पुनरुज्जीवन प्रकल्प नेमका काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, तो कशा पद्धतीने राबवला जाणार आहे, आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. हा माहितीपट ‘पुणेरी’ या युट्युब चॅनेलवर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.