Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- नारायण राणे यांच्याशिवाय पुढे जाणार जन आशीर्वाद यात्रा.
- राणे यांना अटक झाल्यानंतर भाजपने घेतला मोठा निर्णय.
- प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचा पुढचा प्रवास.
वाचा:नारायण राणे यांना अखेर अटक; रत्नागिरीत हाय व्होल्टेज ड्रामा
केंद्रातील मोदी सरकारमधील भाजपच्या नवीन मंत्र्यांची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ही यात्रा काढण्यात येत आहे. प्रत्येक मंत्र्याला त्यासाठी क्षेत्र नेमून दिलेलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवली जात असून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शनही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी चर्चेत राहिली आहे. त्यात राणे यांनी या यात्रेदरम्यान सोमवारी आक्षेपार्ह विधान केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली आणि कानाखाली आवाज काढण्याची भाषा त्यांनी केली. यावरून महाराष्ट्रात आज मोठा गदारोळ माजला. नाशिकमध्ये राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राणेंविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचवेळी राज्यात तीव्र पडसादही उमटले. या सर्व पार्श्वभूमीवर रत्नागिरीत संगमेश्वर येथील गोळवलीत राणे पोहचले असता तिथे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या कारवाईने राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागेल, असे वाटत होते. मात्र भाजपने तातडीने त्याबाबत निर्णय घेतला आहे.
वाचा:नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून तातडीचा दिलासा नाही
राणे यांना अटक झाली तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यानुसार राणेंच्या अटकेनंतर ही यात्रा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर हे मुंबईत होते. पक्षाच्या निर्णयानंतर ते तातडीने रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. रत्नागिरीत पोहचल्यावर संगमेश्वर येथे जाऊन ते यात्रा पुढे नेणार आहेत. राणे यांच्या यात्रेला १९ ऑगस्ट रोजी मुंबई येथून सुरुवात झाली. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील वसई, विरार, नालासोपारा या भागांचा दौरा करून ते सोमवारी रायगड जिल्ह्यात पोहचले होते. रायगडमध्ये जनतेशी संवाद साधल्यानंतर ते आज रत्नागिरीतील संगमेश्वर येथे पोहचले होते. तिथे त्यांच्यावर कारवाई झाली. राणे यांचं होमपिच अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यात यात्रा पोहचण्याआधीच त्यांना अटकेला सामोरं जावं लागलं.
वाचा: नारायण राणे प्रकरणावर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया