Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सिंधुताईंनी हजारो अनाथांच्या जीवनातील अंध:कार दूर केला- न्या. शिवकुमार डिगे

18

पुणे,दि.१४ :- पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई)’ यांचे आयुष्य, कार्य आणि विचार बहुसंख्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांची वास्तू आणि वस्तू जतन करून पुण्यातील मांजरी येथील ‘सन्मती बाल निकेतन’ संस्थेत ‘माई निवास’ नावाने संग्रहालय तयार केले असून याचे उद्घाटन न्या. शिवकुमार डिगे (न्यायाधीश मुंबई हायकोर्ट), यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक खाडे (प्रसिद्ध उद्योजक), प्रमुख पाहूणे जसविंदरसिंग नारंग (सीईओ,बिलू पुनावाला फाउंडेशन) हे तसेच ममता सिंधुताई सपकाळ (अध्यक्षा- सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन आणि शिक्षण संस्था, पुणे) तसेच माई परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. सिंधुताई सपकाळ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस, बालदिन आणि दिवाळी पाडवा असा त्रिवेणी योगाचे औचित्य आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन संमारंभास दिलीप मुरकुटे. (संस्थापक बाणेर नागरी पतसंस्था मर्यादित, बाणेर), सागर पेडगीलवार (सेल्स अँड मार्केटिंग, पेडगीलवार कॉर्पोरेशन),ॲड ज्ञानेश शहा, वृषाली रणधीर (प्राचार्या, नेस वाडिया कॉलेज) विनय सपकाळ (मदर ग्लोबल फाऊंडेशन), स्मिता पानसरे (ममता बालसदन) यांच्यासह अनेक क्षेत्रांतील मान्यवर हजर होते. तसेचसिंधुताई यांच्या तीनही संस्थांचे सासवडच्या ममता सदन मधील मुली तसेच शिरूरच्या मनःशांती छत्रलयातील मुले हे सगळे मिळून १५० जण या कार्यक्रमासाठी आज एकत्र आले होते.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

न्या. शिवकुमार डिगे म्हणाले की, दिवाळीचा सण म्हटलं की आपण दिवे लावतोच, दिवा म्हणजे अंध:कार दूर करणारा, माईंनी हजारो अनाथांच्या जीवनातील अंध:कार दूर केला. माईंचं कार्य या आकाश दिव्यासारखं होते, त्यांनी फक्त एक परिसर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा देश उजळवून टाकला. हे कार्य खूप मोठं आहे. माईंचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे, असं म्हणतात की, अमृत प्यायल्याने माणूस अमर होतो, परंतु माई जरी आज हयात नसल्या तरी त्यांच्या कार्याने आणखी अमरत्व मिळणार आहे. त्यांचं कार्य शेकडो वर्षे पुढे चालणार आहे. माई अनेक संस्थांच्या पदाधिकारी होत्या, अध्यक्ष होत्या. मला माईच्या रुपाने माणसांमधील देवी भेटली. त्या नेहमी मला लेकरा अशी हाक मारत, कोण बनेगा करोडपती कार्यक्रमात अमिताभ बच्चन हे माईच्या पाया पडले, त्यानंतर त्यांनी मला भारावून फोन केला. मी माईंना म्हटले,अमिताभ बच्चन हे सिनेमाच्या पडद्यावरचे सुपरस्टार आहेत, तुम्ही तर लोकांच्या ख-या जीवनातील वास्तवातील हिरो आहात, नाना पाटेकरांची आणि माईंची घडवून आणलेली भेट, लालबागच्या गणपतीला माईंना घेऊन गेल्यावर माईंच्या दर्शनाला लागलेली भली मोठी रांग, अशा अनेक आठवणींना न्या. शिवकुमार डिगे यांनी उजाळा दिला.

अशोक खाडे सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले,माईंचे आणि माझे नाते मायलेकरासारखं होते. मी आणि माई एकाच ताटातच जेवायचो, तिच्या पदरला मी माझा हात पुसायचो. मी माझ्या आईसाठीच जगलो, मी आईसाठीच उद्योजक झालो, जे काही झालो ते आईसाठीच झालो. माई माझ्या घरी यायची. माझ्या आईला, भावंडांना भेटायची. माझ्या आईला सिंधूताई सपकाळ कोण आहे हे माहित नव्हतं पण महाराष्ट्रभर मी गाजलो ते केवळ माईंमुळेच, ती प्रत्येक भाषणात माझा उल्लेख करायची. आज माई जरी आपल्यात नसली तरी तिचे कार्य पुढे नेण्यासाठी जिवंत असे पर्यंत मी साथ देणार आहे. या ‘माई निवास’ संग्रहालयामुळे सिंधुताईंच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तसेच पुढच्या पिढीलाही माईंचे कार्य समजणार आहे.

प्रास्ताविक भाषणात ममता सिंधुताई सपकाळ, म्हणाल्या की, माईंचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आज त्या असत्या तर मोठ्या सभागृहात कार्यक्रम झाला असता लाखोंनी शुभेच्छा आल्या असत्या. त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून उद्याच्या पिढीला माईंचे जीवन काय होतं हे बघायला मिळण्यासाठी तिच्या अनेक वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. माई जरी आज नसल्या तरी त्यांचा वारसा आज आपण सोबत घेऊन जपतोय, पुढे घेऊन जातोय याचा अभिमान आहे. मागील वर्षी आम्ही इथे माईंची मुर्ती बसवली तेव्हा ब-याच जणांनी आम्हाला विचारलं की, तुम्ही माईंची मूर्ती बसवली तर मग माईंची रुम का नाही उघडत, माईंच्या रुमचे आम्हाला दर्शन घेता येईल, माईच्या रुममध्ये जाता येईल. कुठेतरी माझ्या मनात विचार येत राहिला की, माईची रुम सगळ्यांसाठी खुली केली पाहिजे. सगळ्यांना दर्शन मिळाले पाहिजे, कारण माईंचा साधेपणा, काम असं होतं की लोकांपर्यंत थेट गेलं पाहिजे, लोकांना माहित व्हावं की माई कशा जगत होत्या. जेव्हा मी माईंच्या वस्तू संग्रहालयात ठेवायच्या म्हणून शोधत होते मला काहीच सापडलं नाही. एक प्लास्टिकचा आरसा सापडला, एक कंगवा सापडला, एक टिकलीची डबी सापडली. मला असा प्रश्न होता की संग्रहालयात काय ठेवू. कारण ब-याच ठिकाणी आपण संग्रहालयात जातो आपल्याला अनेक वापरातल्या अनेक वस्तू पहायला मिळतात पण माईंचं असं काहीच सापडलं नाही. मला माईच्या कपाटात एखादं अवार्ड किंवा सन्मानपत्र सापडायचं, तिचं स्वत:चं असं काहीच नव्हतं. हे वेगळेपण लोकांसमोर यायला पाहिजे म्हणून माईंचे जे जे माझ्याजवळ होते ते ते सगळं या ‘माई निवास’ मध्ये ठेवलेले आहे.

मनीषा नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.