Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतीय संविधान संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग; मुंबई विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा

11

Mumbai University Constitution Day : जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेकडे पाहिले जाते. समर्थ भारताच्या भविष्याचा वेध घेऊन, ते घडून आणण्यासाठी उपयुक्त तसेच अडथळा ठरू शकतील अशा सर्व बाबींचा विचार करून अनुरुप संवैधानिक तरतूदींचा घटनेत समावेश करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून अथक परिश्रम घेतले. संविधान देशाला एकसंध ठेवणारी आणि देशवासीयांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या भौतिक आणि आत्मिक उन्नयानाची प्रभावी उभारणी करणारी प्रेरक शक्ती असून भारतीय संविधान संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन आज मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या दिनी मान्यवरांनी व्यक्त केले. २६ नोव्हेंबर ‘राष्ट्रीय संविधान दिन’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात “प्रॉब्लेम ऑफ रुपीः मूळ आणि त्याचे निराकरण” विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मा. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले, प्रवरा इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरु प्राचार्य डॉ. विष्णू मगरे, भारतीय रिजर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक डॉ. सतीश मराठे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव श्री. दिनेश डिंगळे, बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे (आयआरएएस), मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संचालिका आणि परिषदेच्या निमंत्रिका प्रा. मनिषा करणे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक आणि परिषदेचे निमंत्रक प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या दृरदृष्टिकोनातून ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ लिहून रुपयाच्या होणाऱ्या अवमूल्यनावर अत्यंत परखडपणे भाष्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संविधानाला अपेक्षित समाजनिर्मितीकडे आपणास वाटचाल करायची असून संविधानामुळे आपल्याला सशक्त व्हायचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने मुंबई विद्यापीठात डॉ. आंबेडकर चेअर स्थापन केली जाणार असून त्या अनुषंगाने विद्यापीठाने प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी प्रवरा इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरु प्राचार्य डॉ. विष्णू मगरे यांनी भारतीय संविधान निर्मितीचा प्रवास उलगडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले, जगात सर्वोच्च लोकशाहीची व्याख्या बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे अनन्यसाधारण महत्व असून तो मानवमुक्तीचा सरनामा असल्याचे त्यांनी सांगितले. सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग असून सरनामा भारतीय घटनेचा अन्वयार्थ लावत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, लोकशाहीची मुल्ये आणि राष्ट्राची एकात्मता या तत्वांची जपणूक आणि वृध्दींगत होण्यासाठी संविधान दिनाचे अनन्यसाधारण महत्व असून हा लोकशाहीच्या उत्सवाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या महान ग्रंथाची निर्मिती करून पारंपारिक अर्थ विचारातून आधुनिक युगाकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन केले. बाबासाहेबांनी सादर केलेल्या या प्रबंधाच्या या ऐतिहासिक घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार कोणत्याही काळातील महत्तम अशा प्रखर बुद्धीवत्तेचे द्योतक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठास डॉ. आंबेडकर चेअर देण्याच्या प्रस्तावाबद्दल त्यांनी मा. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांचे आभार मानले.

यावेळी भारतीय रिजर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक डॉ. सतीश मराठे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुपयाचे अवमूल्यन थांबविण्याच्या भूमिकेतून सादर केलेल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या २७० पानाच्या प्रंबंधातून केलेल्या मांडणीचा परामर्श घेतला. भारतीय अर्थव्यवस्था पुढील काही वर्षात जगातील तीसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणार असल्याचे सांगून देश विकासाच्या मार्गावर असून साश्वत विकासाकडे आपण मार्गक्रमण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव श्री. दिनेश डिंगळे यांनी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष योजनेच्या माध्यमातून विविध समाज घटकांच्या सक्षमीकरणासाठी हातभार लागत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचा शुभसंदेश त्यांनी सभागृहात वाचून दाखवला.

संविधान दिनाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर इन पोलिटीकल इकॉनॉमी आणि मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

“प्रॉब्लेम ऑफ रुपीः मूळ आणि त्याचे निराकरण” विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ज.वि. पवार, डॉ. रूथ कट्टूमुरी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन, डॉ. किसन इंगोले, निवृत्त प्राध्यापक, श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, डॉ. भीमराव भोसले, केंद्रीय विद्यापीठ हैद्राबाद यांनी त्यांचे विचार यावेळी मांडले. समारोपिय सत्रात पद्मश्री डॉ. रमेश पतंगे आणि बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे यांनी मार्गदर्शन केले. तर या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अहवालाचे वाचन प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी केले.

या दिनाचे औचित्य साधून सकाळी ९ वाजता संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. तर याच दिनाचे औचित्य साधून डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.