Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे की, नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.
छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आपल्याला स्वबळावर मोठे यश मिळू शकते, याची खात्री भाजपला वाटू लागली आहे. त्यामुळेच शिंदे गट आणि अजितदादांच्या गटाचे जोखड मानेवरुन दूर सारुन स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजप आणि संघाच्या गोटात सुरु असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
शिंदे गटाच्या खासदारांनाही कमळ चिन्हावर लढण्याचे वेध?
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या काही खासदारांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे आगामी लोकसभा निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर लढण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. राजकीय वर्तुळात याबाबत बरीच चर्चाही झाली होती. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपने मोदींच्या नावावर निवडणूक लढवली होती. या राज्यांतील मतदारांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या कमळ चिन्हाला भरभरुन मतं दिली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही ‘कमळा’ची चलती राहण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट हेरून शिंदे गटाच्या काही खासदारांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचे कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने अद्याप हा प्रस्ताव मान्य केलेला नाही.