Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दसरा तुमच्यासाठी ठरेल खास, जाणून घ्या विजय मुहूर्त आणि साजरा करण्याची पद्धत
विजयादशमी आणि दसरा
दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.
आपट्याची पाने सोने वाटण्याची परंपरा
दसर्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वडिलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे, असा एक मतप्रवाह आहे.
आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व
आपट्याला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा आहे. दसर्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा, असे सांगितले जाते.
आपट्याची पूजा करताना पुढील मंत्र म्हणतात –
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
याचा अर्थ असा की, हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर, अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे विकल्पाने तांब्याचे नाणे ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात. यानंतर आपट्याची पाने सर्व नातलग आणि मित्रमैत्रीणींमध्ये वाटतात.