Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- नारायण राणे यांच्या अटकेवर अजित पवार बोलले.
- भान ठेऊन बोलले असते तर ही वेळ आली नसती!.
- राणे यांच्या खात्यावरही उपमुख्यमंत्र्यांची टोलेबाजी.
वाचा:राज्यात गणेशोत्सवावर यंदाही कठोर निर्बंध?; केंद्र सरकारने केली स्पष्ट सूचना
‘मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोणावरही टीका करताना भान ठेवून बोलले पाहिजे. पक्ष वाढविण्यासाठी यात्रा काढत असताना भान ठेऊन तुम्ही वक्तव्य केली असती तर ही वेळ आली नसती. पदावर असताना जबाबदार वक्तव्य करणे महत्त्वाचे आहे’, असे नमूद करत अजित पवार यांनी एकप्रकारे राणेंच्या अटकेची कारवाई योग्यच होती असे सांगण्याचा प्रयत्न केला. इतरांनीही मागे काही वक्तव्ये केली पण तेव्हा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली नव्हती, हे लक्षात घेण्याची गरज आहे. शेवटी त्या पदाला महत्त्व आहे, असे पवार पुढे म्हणाले. ‘आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यानुसार राज्यातल्या या चौघांना मंत्रिपद दिल्यानंतर वरून आदेश आला. जा फिरा यात्रा काढा. वरून आदेश आलेत म्हटल्यावर फिरणं भागच आहे. त्यानुसार ते फिरत आहेत पण सोशल मीडियात यावर लोक काय प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत ते जरा पाहा’, असे म्हणत अजित पवार यांनी भाजप मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेवरही निशाणा साधला. कोविड नियम मोडल्याने जन आशीर्वाद यात्रेवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचे अजित पवार यांनी समर्थन केले. नियम सर्वांसाठी समान असतात, असे ते म्हणाले.
वाचा:राड्यानंतर ठाकरे-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा!; नेमकं काय ठरलं?
राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता, सुक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार?, केंद्रातून निधी द्यायचाच म्हटलं तर नितीन गडकरी यांचं खातं निधी देऊ शकतं. गडकरींनी याआधी बराच निधी दिला आहे. राज्यात अनेक कामेही प्रगतीपथावर आहेत, असेही अजित पवार म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर २५ लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यात कुणाला किती फायदा झाला, की झालाच नाही, हा संशोधनाचा विषय आहे, असे सांगत पवार यांनी त्यावरही निशाणा साधला.
अनिल परब यांचे केले समर्थन
नारायण राणे यांच्या अटकेमागे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब असल्याचा आरोप केला जात आहे. ते फोनवर बोलतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. याबाबत विचारले असता अजित पवार यांनी परब यांचे समर्थन केले. ‘अनिल परब यांना तेव्हा काय मेसेज मिळाला माहीत नाही. मात्र जिल्ह्यात काही इमर्जन्सी असल्यास जिल्हाधिकारी किंवा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तातडीने पालकमंत्र्यांना संपर्क साधतात व त्यांना अवगत करतात. अशावेळी पालकमंत्री म्हणून योग्य असा निर्णय घ्यावा लागतो’, असे अजित पवार म्हणाले.
गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत म्हणाले…
गणेश विसर्जन मिरवणूक काढायची की नाही, याबाबत पुणे विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांना अहवाल दिला जाणार आहे त्यानंतर याबाबत निर्णय होईल, असे याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिका वगळता अन्य ठिकाणी एक सदस्यीय प्रभाग पद्धत की दोन सदस्यीय प्रभाग करायचा, याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात बैठक घेऊन घेतला जाणार आहे, असे यावेळी पवार यांनी सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
वाचा: कोविड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी लाच मागितली आणि…