Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भाजपच्या जवळ जाण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही उत्तर भारतीय मतांचं गणित लक्षात घेऊन भाजपने राज ठाकरे यांना ठराविक अंतरावर ठेवलं. शिवसेना शिंदे गट तसेच भाजप नेत्यांच्या राज यांच्यासोबतच्या भेटीगाठी, त्यांच्याबरोबरच्या चर्चा हे सगळं अधूनमधून सुरू आहे. मात्र चर्चेचं रुपांतर राजकीय युती-आघाड्यांमध्ये होत नाहीये. अशावेळी मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावं, असं अनेक मराठी माणसांना वाटतं. गेली ५० वर्ष चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते संवेदनशील कलाकार नाना पाटेकर त्यापैकीच एक… त्यांनीही राज-उद्धव एकत्र आले तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचवेळी ठाकरे कुटुंबियांविषयीचा जिव्हाळा त्यांनी बोलून दाखवला.
मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ओले आले’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचनिमित्ताने दोघांनीही ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक गमतीदार प्रसंग, मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील जुने दिवस, महाराष्ट्राला जाणवत असलेल्या दुष्काळाच्या झळा तसेच सध्याच्या सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर नाना पाटेकर काय म्हणाले?
याआधीही नाना पाटेकर यांनी राज-उद्धव यांनी एकत्र यावं, अशा भावना बोलून दाखवल्या होत्या. आजही ठाकरे बंधूंची भेट झाल्यावर नानांनी असाच आशावाद बोलून दाखवला. “जेव्हा जेव्हा मी मातोश्रीवर जायचो तेव्हा तेव्हा राज आणि उद्धव यांना मी एकत्रच पाहिलं आहे. त्यांनी जरूर एकत्र यावं. छान, चांगलं आहे.. भावंडांना एकत्र येण्याचा अधिकार नाहीये का? राजकीयदृष्ट्या काय होईल, याचे आडाखे तुम्ही कशाला बांधताय? ते एकत्र आले तर तुम्हाला कशाला वाईट वाटायला पाहिजे? मला तर खूप आनंद होईल”, असं नाना म्हणाले.
“हा ही चांगला-तो ही चांगला” आपल्याच भूमिकेवर नाना काय म्हणाले?
नाना पाटेकर यांची भूमिका “हा ही चांगला-तो ही चांगला” अशी असल्याची सातत्याने टीका होते. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “समाजात सगळंच काही वाईट चाललेलं नाही. जर पंतप्रधान मोदी चांगलं काम करत असतील तर मी कशासाठी टीका करायला पाहिजे? मग मला कुणी मोदीभक्त म्हटलं, मी फडणवीस यांची स्तुती केली तर मला कुणी फडणवीसांचा भक्त म्हटलं… पण मी माझ्या तरुणपणी शरद पवार यांना माझं आयडॉल मानलेलं होतं. गडकरींच्या भाषणातले आकडे, त्यांची बोलण्याची पद्धत, राज ठाकरे यांची राजकीय समज, त्यांनी बांधलेले आडाखे सगळेच खरे ठरलेत की… जर मला एखाद्याची काही गोष्ट खटकत असेल तर मी जाहीरपणे सांगायची काय गरज..? मी त्याला एकट्याला सांगेन ना… मला वाटतं चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, असं नाना पाटेकर म्हणाले.