Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मृत्यूनंतर शेतकरी जिवंत; ह्रदयही धडकणार अन् डोळेही पाहतील जग, कुटुंबाच्या एका निर्णयाने पाच जणांना जीवदान
‘मरावे परी अवयवरुपी उरावे’ या उक्तीच्या प्रसार आणि प्रचारासाठी राज्यातच नाही तर देशात अवयवदानाची चळवळ राबविण्यात येत आहे. परंतु, अजूनही या चळवळीला समाजातून तेवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. हळूहळू याबाबत जनजागृती होत असून, त्यामुळे काही मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान शहरात होऊ लागले आहे. नाशिकच्या सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने असाच एक अभूतपूर्व ग्रीन कॉरिडॉर शुक्रवारी राबविला. रस्ते अपघातात मेंदूमृत (ब्रेनडेड) झालेल्या एका ३४ वर्षीय शेतकरी युवकाचे अवयव त्याच्या मृत्यूपश्चात विविध रुग्णांना जीवदान देण्यासाठी पाठविण्यात आले. नाशिकहून ग्रीन कॉरिडॉरद्वारे हे अवयव अहमदाबाद व पुणे येथील गरजू पाच रुग्णांना पाठविण्यात आले. याबाबत माहिती देताना सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय चावला म्हणाले, पेठ तालुक्यातील बोरीची बारी या गावातील ३४ वर्षीय शेतकरी रस्ते अपघातामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. परंतु, त्याला २१ डिसेंबर रोजी ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या तरुणाच्या नातेवाइकांनी पुढाकार घेऊन अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. यानंतर सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने पोलिस व संबंधित यंत्रणेच्या सहकार्याने ग्रीन कॉरिडॉरचे नियोजन केले.
विशेष विमानाने हृदय रवाना
शुक्रवारी दुपारी साडेचारनंतर या तरुणाचे हृदय रुग्णवाहिकेतून ओझर विमानतळाकडे मार्गस्थ झाले. तेथून ते विशेष विमानाने अहमदाबाद येथील सिम्स हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. या तरुणाचे डोळे आडगाव येथील मेडिकल कॉलेजकडे पाठविण्यात आले असून, किडन्या व लिव्हर पुण्यातील खासगी हॉस्पिटल्सला पाठविण्यात आले आहे. सह्याद्री हॉस्पिटलतर्फे डॉ. पंकज वारके, डॉ. दीपक पाटील आणि डॉ. जितेंद्र खैरनार तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
कुठे गेले अवयव
हृदय – सिम्स हॉस्पिटल, अहमदाबाद
एक किडनी – डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पुणे
दुसरी किडनी – ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे
लिव्हर – डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पुणे
डोळे – एनडीएमव्हीपी हॉस्पिटल, नाशिक