Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कुरारच्या शिवाजीनगरमधील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एक तरुण पैसे काढण्यासाठी गेला. त्याने दोन हजार रुपये काढले, मात्र सर्व प्रक्रिया होऊनही पैसे आले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने तत्काळ कुरार पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशी जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजीव गावडे, उपनिरीक्षक संतोष खरडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. एटीएम सेंटर आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हींची झाडाझडती घेतली असता एक रिक्षा येथून आप्पापाडा परिसरात जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या रिक्षाचा पाठलाग करून आतमध्ये बसलेल्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एटीएम मशिन नादुरुस्त करण्याचे साहित्य सापडले. त्यावरून त्यांची सखोल चौकशी केली असता मोठी टोळी सक्रिय असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रामू राम उर्फ आदित्य दयाराम भारतीया, सूरज राजेश तिवारी, संदीपकुमार रामबहादूर यादव, अशोक हरीहरनाथ यादव, राकेशकुमार रामबाबू यादव आणि रविकुमार महेंद्रकुमार यादव अशा सहा जणांना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी अशा प्रकारचे गुन्हे करण्यात तरबेज असून त्यांच्याविरुद्ध मुंबई आणि उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये बारा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या अटकेने आणखी गुन्हे उघडकीस येऊ शकतात, असे पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांनी सांगितले.
अशी करत होते हातचलाखी
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्लास्टिकच्या २७ पट्ट्या, या पट्ट्या चिकटविण्यासाठी फेव्हीक्विकची २५ पाकिटे, चिकटपट्टी, विविध बँकांचे १० एटीएम कार्ड, रोख रक्कम आढळली. ही टोळी सुरक्षारक्षक नसलेले एटीएम सेंटर शोधत असे. कुणी पैसे काढण्यासाठी येण्याच्या आधीच एटीएममधून पैसे बाहेर येणाऱ्या ठिकाणी प्लास्टिकची पट्टी चिकटविली जात असे. पैसे बाहेर न आल्याने ग्राहक निघून गेल्यावर ही टोळी आतमध्ये जाऊन ही पट्टी काढायची व मध्येच अडकून पडलेली रक्कम घेऊन पसार होत असे.