Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाईची २५ टक्के रक्कम ऑगस्टअखेरपर्यंत देणे अपेक्षित असतानाही विमा कंपन्यांनी त्याचे गांभीर्य न राखल्याने भुसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी भुसे यांनी पीकविमा योजनेचा आढावा घेतला. बैठकीला अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, ओरिएंटल पीकविमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित आदी उपस्थित होते.
पीकविम्याची रक्कम तातडीने वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असतानाही पीकविमा कंपन्यांनी हा मुद्दा गांभीर्याने का घेतला नाही? तुम्ही मुख्यमंत्र्यांचेही ऐकणार नाहीत का, असा संतप्त सवाल भुसे यांनी उपस्थित केला. सरकारने निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही त्याचे वाटप का केले नाही? तुम्ही येथे धंदा करायला बसला आहात का? शेतकऱ्यांना पैसे देता म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाही, अशा शब्दांत भुसे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप झाले नाही, तर तुमच्या कार्यालयात येऊन नववर्षाचे ‘गिफ्ट’ देऊ, असा इशाराही भुसे यांनी दिला.
-५,८८,७४८ शेतकऱ्यांचा यंदा पीकविमा योजनेत जिल्ह्यातून सहभाग
-५५ महसुली मंडळांमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम वाया
-पीकविम्याचे पहिल्या २५ टक्क्यांपैकी १०५ कोटी रुपये सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मंजूर
-पीकविमा कंपन्यांनी ५७ कोटी ४६ लाख रुपयेच वितरित केल्याची कृषी अधिकाऱ्यांची माहिती
-रब्बी हंगामावरदेखील उभे ठाकलेय प्रश्नचिन्ह
-सोयाबीन, मका, बाजरी व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
‘बांधावर गेलात का कधी?’
शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. त्यांना मदतीची गरज आहे. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलात का, असा प्रश्न भुसे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हसून नाही असे उत्तर दिल्यामुळे भुसे अधिकच संतप्त झाले. तुम्ही हसून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळू नका, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.