Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘मविआ’चा फॉर्म्युला ते दादा गटाचा बारामतीचा उमेदवार, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

10

म. टा. प्रतिनिधी, पुणे : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप जाहीर केला नाही. मात्र, दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार तसेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यामुळे पंधरा दिवस थांबा, ‘मविआ’चा फॉर्म्युला लवकरच समजेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पुण्यात बिबवेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. संजय राऊत यांनी लोकसभेच्या शिवसेना २३ जागा लढविणार असल्याचे भाष्य केले होते. त्याच संदर्भ देऊन सुप्रिया सुळे यांना विचारता त्यांनी त्यावर उतर दिले. ‘तुम्ही त्याची चिंता करू नका. आम खाओ, पेड मत गिनो’, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

कॅबिनेटमध्ये गँगवार?

‘या राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये अक्षरशः गँगवार झाला आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये कोणी बोलत नाही. कोणाचे ऐकले जात नाही. छगन भुजबळांसारख्या वरिष्ठ मंत्र्यांचे कॅबिनेटमध्ये कोणी ऐकतच नाही हे स्पष्ट आहे. त्यांचा मान सन्मान ठेवला जात नाही. हे दुर्देव आहे. ज्या गोष्टींची कॅबिनेटमध्ये चर्चा व्हायला हवी त्या गोष्टी महाराष्ट्राच्या ज्येष्ठ मंत्र्यांना मिडियाला बाहेर येऊन बोलावे लागते. त्यावरून संजय राऊत म्हणतात, त्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये गँगवार सुरू आहे. सरकारला प्रशासन चालवायचे नाही. पक्ष फोडायचे, घर फोडायचे आणि सगळ्यांना भीती दाखवायची आणि मनमानी करायची सर्वसामान्य माणूस भरडला गेला तरी चालेल हे मात्र सत्तेत राहिले पाहिजे,’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

चर्चेच्या मागणीमुळे निलंबन

बारामतीत लोकसभेला योग्य तो उमेदवार देणार, असे अजित पवार म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘माझ्यासाठी ही लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीत चालते. दिल्लीत आणीबाणी चालली आहे. चार कायदे पास केले. कांदा, शेतकरी तसेच जम्मू काश्मीर, मणीपूर, तसेच पूँछमधील हल्ल्याच्या प्रश्नावर आम्ही चर्चा व्हावी, अशी मागणी करीत होतो. संसदेत कायदे मान्य करण्यासाठी आणीबाणी करीत आम्हाला निलंबित करण्यात आले. संसदेच्या इतिहासात प्रथमच दीडशे खासदार निलंबित झाले. ही आणीबाणी नाही तर काय आहे,’ असे सांगून ही अघोषित आणीबाणी आहे,’ अशीही टीका सुळे यांनी केली. लोकशाही टिकविण्यासाठी आम्हाला सक्षमपणे काम करावे लागेल. त्यामुळे आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणुका लढविणार असून बारामतीत कोणीही उमेदवार येऊ दे. ती लोकशाही आहे, असे सांगायला त्या विसरल्या नाहीत.

गृहमंत्र्यांचे अपयश

‘नागपूरला क्राईम रेट वाढतो, जालन्यात लाठी हल्ला होतो तसेच पुण्यात ड्रग्ज रॅकेट सापडते,’ या प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या सर्व घटनेला गृहमंत्री फडणवीस जबाबदार आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.

मतभेद आहेत, मनभेद नाही

अजित पवार गटाकडून बारामतीत उमेदवार कोण असा प्रश्न विचारताच, ‘अजित पवार गट नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असे म्हणा,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा दावा केला आहे. त्याबाबत विचारता सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी कोणाची आहे याबाबत सध्या निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्याचा निकाल लागल्यावर कळेल.’ ‘आमच्याकडे लोकशाही आहे. दडपशाही नाही. कोणाच्याही घरात मतभेद होतात. मोकळा श्वास घेऊन प्रश्न उपस्थित करू शकतो. ‘इंडिया’ आणि ‘मविआ’ हे लोकशाहीने चाललेले आहे. त्यानुसार आमच्या कुटुंबांमध्ये चर्चा होते. भीती दाखविली जात नाही. म्हणून मतभेद झाले म्हणजे मनभेद आहे असे नाही, अशा शब्दांत अजित पवार यांच्याशी मनभेद नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.

मुस्तफा आतार यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.