Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून लढा उभारला. चर्चेनंतर आंदोलन मागे घेऊन, त्यांनी सुरुवातीला सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला होता. जरांगे यांनी त्यासाठी २४ डिसेंबरची मुदत दिली होती. ही मुदत संपत आल्याने त्यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली. ‘आंदोलनादरम्यान मला भेटण्यासाठी कोट्यवधी मराठा समाज मुंबईत धडकेल’, असा एकप्रकारे इशाराच जरांगे यांनी सरकारला दिला. बीड येथील सभेपूर्वी जरांगे यांनी रॅली काढली. ‘एवढ्या मोठ्या संख्येने जनता जमा झाली आहे. बीड जिल्ह्यातील मराठा वादळ पाहून विरोधकांना पळता भुई झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी म्हणते आमचे घर जाळले, हॉटेल जाळले; पण आजचा एवढा समुदाय पाहता आपण हे काम केले नसून, त्यांनी स्वतःच स्वत:ची घरे जाळली आहेत,’ असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
‘जाळपोळप्रकरणी आमच्या निष्पाप मुलांना गोवण्याचे काम सरकारने गेले. मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. आज लाखोंच्या संख्येने आमचा मराठा समाज शांततेत शहरात गेला आणि रॅली काढून मैदानात आला. शांतताप्रिय लोक कुणाच्या घरावर जाऊ शकत नाहीत. ‘येवल्याचं येडं’ आलं आणि त्यांनीच पाहुण्याचे हॉटेल जाळले,’ अशा शब्दांत जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली. ‘सरकारकडे अजूनही दहा-पंधरा दिवस आहेत. आम्ही अंतरवाली सोडली व मुंबईत निघालो, की आमची-तुमची चर्चा बंद. मराठ्यांनी मुंबईकडे कूच केले, तर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही,’ असा इशारा जरांगे यांनी दिला.
क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी होणार
नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भातील उपचारात्मक म्हणजेच क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून, यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. भूषण गवई, संजय किशन कौल व संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने २४ जानेवारी, २०२४ रोजी या प्रकरणावर विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील न्या. कौल सोमवार, २५ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. ही क्युरेटिव्ह याचिका म्हणजे एकप्रकारे राज्य सरकारला शेवटची संधी आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News