Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सांताक्रूझ येथे रविवारी १८.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे २१.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. शनिवारपेक्षा रविवारचा पारा दोन्ही केंद्रांवर अनुक्रमे ०.७ आणि ०.४ अंशाने खाली उतरला. कमाल तापमानात वाढ झाली. सांताक्रूझ येथे रविवारी ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. कुलाबा येथे ३२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. हे तापमान दोन्ही केंद्रांवर शनिवारपेक्षा ०.८ आणि १ अंशाने अधिक होते. सांताक्रूझचा पारा सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक नोंदला गेला.
किमान आणि कमाल तापमानात सांताक्रूझ येथे १६.६ अंशांचा फरक होता. तापमानाची ही परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहील, अशी माहिती प्रादेशिक हवामान अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. सध्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून आहे. हे वारे कोरडे आहेत. त्यामुळे कमाल तापमान वाढले आहे. मुंबईमधील ढगाळ वातावरण कमी झाले असून, सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे तापमानाचा ताप वाढला, असे त्या म्हणाल्या.
मुंबईत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वाधिक कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. तर सन २०२०मध्ये हे तापमान ३६.४ अंश सेल्सिअस होते. सन २०१६ आणि २०१५मध्येही कमाल तापमानाचा पारा ३६ अंश पार गेला होता. मात्र २०१६ आणि २०१५मध्ये डिसेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पारा चढा होता.
धूरकट वातावरण
वातावरणातील तप्तता दुपारच्या वेळी वाढलेली असली, तरी रविवारीही मुंबईतील वातावरण धूरकट होते. मुंबईच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात रविवारीही फारशी सुधारणा नव्हती. सोमवारी हा निर्देशांक २०४ म्हणजे वाईट श्रेणीत असण्याचा अंदाज केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘सफर’ या हवेची गुणवत्ता नोंदणाऱ्या प्रणालीतर्फे वर्तवण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथे २८३, अंधेरी पूर्व येथे २६७, माझगाव येथे ३००, वरळी येथे २९४ असा निर्देशांकांचा अंदाज सफरने वर्तवला आहे.
Read Latest National Updates And Marathi News