Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीतलं मोठं प्रस्थ आहे. त्यांचे वडील देखील राष्ट्रवादीमध्ये होते. त्यांनी शरद पवार यांना भक्कम साथ दिली. पवार घराण्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर वाघेरे यांच्या मनात चलबिचल सुरू होती. सुरूवातीला शरद पवार यांच्यासोबत राहिलेले वाघेरे पुढील राजकीय समीकरे लक्षात घेऊन अजितदादांसोबत गेले. मात्र मावळमधून उमेदवारी मिळण्याच्या शक्यता धूसर दिसू लागताच त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
‘मातोश्री’वरील भेटीत काय घडलं?
याबाबत ‘मटा ऑनलाईन’ शी बोलताना संजोग वाघेरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री वरील सदिच्छा भेट होती. तसेच मी मावळ लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे. गेली दोन टर्म मी लोकसभेची तयारी करतो आहे. पण मला लोकसभेची संधी दिली गेली नाही. यंदा मला लोकसभेसाठी संधी मिळावी अशी अपेक्षा आपण उद्धव ठाकरे यांचेकडे व्यक्त केली आहे. मी अद्याप प्रवेश केला नाही. त्यावर ठाकरे यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला असून त्यांचा निर्णय आल्यानंतर पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.
कोण आहेत संजोग वाघेरे?
संजोग वाघेरे यांची सुरुवात राष्ट्रवादीतून झाली. शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. पिंपरी चिंचवड शहरातील संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत नगरसेवक, महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषविले आहेत.
संजोग वाघिरे ठाकरेंच्या भेटीला, अजित पवार जाब विचारणार!
संजोग वाघिरे यांचा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो मी पाहिला. त्यांची मातोश्रीवर भेट झाल्याचं कळतं आहे. माझं संजोगबरोबर बोलणं झालेलं नाहीये. पण याबद्दल मी त्याला नक्की विचारणार आहे, असं सांगताना शेवटी लोकशाहीत प्रत्येकाला तसे अधिकार आहे, असं सांगायला अजित पवार विसरले नाहीत. त्याचवेळी महाविकास आघाडीकडे मावळ लोकसभेसाठी उमेदवार नाहीये. तो उमेदवार मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असा निशाणाही त्यांनी साधला.