Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राज्यावर सध्या कोणतीही प्रणाली नाही. त्यामुळे वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र २८ डिसेंबरनंतर किमान तामपानात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात पश्चिमी प्रकोपाचा प्रभाव जाणवू शकतो. मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पश्चिमी प्रकोप आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या एकत्रित प्रभावातून ३० आणि ३१ डिसेंबर मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात ढगाळ वातावरण वाढू शकेल असा अंदाज आहे. या प्रणालीमुळे किमान तापमानात वाढ होऊन दिवसा मात्र गारवा जाणवू शकेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.
पश्चिमी प्रकोपाचा परिणाम दिसू लागल्यावर सध्या उर्वरित महाराष्ट्रात जाणवणारी थंडीची बोच कमी होईल. मध्य महाराष्ट्रात सोमवारी जळगाव येथे सर्वांत कमी किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये १६.४ तर इतर जिल्ह्यांमध्ये ११ ते १५ अंशांदरम्यान किमान तापमान होते. ही थंडी कमी होऊन वातावरणात थोडासा ऊबदारपणा येऊ शकतो असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात या काळात पावसाची शक्यता फारशी नाही असे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. मध्य प्रदेशालगत असणाऱ्या शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्याच्या तुरळक भागात ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
बुधवारपासून पारा २० अंशांच्या वर
कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात सध्या किमान तापमान १५ अंशांच्या खाली पोहोचले आहे. कोकणात मात्र पारा २० अंशांच्या आसपास नोंदला जात आहे. सांताक्रूझ येथे सोमवारी पारा १९.४ अंश तर, कुलाबा येथे २१.८ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. बुधवारपासून पुन्हा एकदा हा पारा २० अंशांच्या वर जाईल, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News