Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मी मध्यमवर्गीय माणूस, अजित पवारांसारख्या नेत्याने मला आव्हान देणं हा माझा गौरव: अमोल कोल्हे

9

पुणे: मी एका सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणे, हा मी एकप्रकारे माझा गौरवच समजतो. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकालाच आपली ताकद आजमवण्याचा अधिकार आहे. शेवटी कोणाला जिंकवायचे, हा निर्णय मायबाप जनता घेत असते. हीच गोष्ट शरद पवार साहेबांनी मला सांगितली. माझा शिरुरमधील जनतेवर पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे समोर कोणीही उमेदवार असला तरी मी माझं काम घेऊन लोकांसमोर जाईन, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना अजित पवार यांनी नुकतीच केली होती. याविषयी अमोल कोल्हे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी म्हटले की, आदरणीय अजितदादा हे मोठे नेते आहेत. ते माझ्यावर टीका करत आहेत. पण मी आहे तिथेच आहे, त्यांनी भूमिका बदलली आहे. त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं. पण अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणं, हा माझा गौरव आहे, असे कोल्हे यांनी म्हटले.

शिवतारेंना सांगून पाडलं, आता कोल्हेंनाही चॅलेंज, अजित पवार शिरूरमध्ये आढळराव पाटलांना तिकीट देणार?

अजित पवार हे आमचे नेते होते. त्यामुळे अजित पवार यांना उलट उत्तर देणे हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणारे नाही. अजित पवार यांच्याविषयी आजही माझ्या मनात व्यक्ती म्हणून आदर आहे. मी शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. माझ्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा १०० टक्के वाटा आहे. येथील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले, त्यामध्ये शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. या मतदारसंघात आठ धरणं कोणाच्या काळात झाली? शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना त्यांच्या धोरणांमुळे शिरुरमधील शेतकऱ्यांचा फायदा झाला, ते सुखी झाले. चाकण, रांजणगाव, सणसवाडी एमआयडीसी; हडपसर आणि मगरपट्टा येथील आयटी पार्कच्या उभारणीत शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. २०१९च्या निवडणुकीत आम्ही शरद पवार साहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेऊन काम केले होते.

कोल्हेंना पाडायचा निर्धार, अजितदादांचा पठ्ठा सरसावला, म्हणतो, तिकीट द्या-शब्द खरा करून दाखवतो!

मी २०१९ मध्ये ज्याठिकाणी होतो, २०२३ मध्येही त्याचठिकाणी आहे. पण अजित पवार आणि इतर आमदारांनी भूमिका बदलली, हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. अजित पवार यांच्याशी झालेल्या खासगी चर्चेचा तपशील मी उघड करणार नाही. खासगीतील चर्चा सार्वजनिक करायची नसते, हा संकेत आहे. अजित पवार यांनी तो काहीप्रमाणात मोडला असला तरी मी तसे करणार नाही. खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये मला दोनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. त्यानंतर शिवस्वराज्य यात्रा आणि २०१९मधील विधानसभा प्रचार आणि आमदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. त्यामुळे आता त्यांनी एक वेगळं विधान केलं म्हणून मी त्यांच्यावर टीका करणार नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार मी सुसंस्कृत राजकारणाची वाट चालणार आहे. शिरुर मतदारसंघातील लोक केवळ निधीपेक्षा तत्व आणि मूल्य या गोष्टीला अधिक महत्त्व देतात, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.