Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात न्या. सुनील शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून आणखी दोन सदस्यांची नियुक्ती केली होती. दरम्यान, मागासवर्ग आयोगाची न्या. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज, बुधवारी ही बैठक होणार असून, त्यात या निकष निश्चितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सामाजिक मागासलेपणाच्या निकषासाठी सात मुद्दे निश्चित असून, त्यासाठी १०० गुण दिले आहेत. शैक्षणिक निकषांमध्ये सहा मुद्द्यांचा समावेश असून, त्यासाठी ८० गुण दिले आहेत. आर्थिक निकषांसाठी सहा मुद्द्यांवर ७० गुण असे एकूण २५० गुण देण्यात आले आहेत. या निकषांच्या आधारावरच राज्यात पुढील वर्षात सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी सांगितले.
राज्य मागासवर्ग आयोगाने गोखले इन्स्टिट्यूटला सॅम्पल टेस्टिंग करण्याचे काम दिले आहे. त्याचा अहवाल आयोगाला सादर केला जाणार आहे. त्या अहवालाच्या आधारे आयोगाने तयार केलेल्या चार उपसमित्या सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. हे काम १५ ते २० दिवसांत पूर्ण करून त्याच्या अहवालावर आयोग पुन्हा सूचना व हरकती मागवणार आहे. त्यापुढील १५ ते २० दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल. महिनाभराच्या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे, असं राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी सांगितले.
यापुढील सर्वेक्षण निकषांनुसार
मागासवर्ग आयोगाकडून मागास दर्जा द्यायच्या वर्गासाठीचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्याचे गुणांकन ठरविण्यात आले आहे. या निकषांनुसार यापुढील सर्वेक्षण केले जाणार आहे. आयोगाने ठरविलेले निकष असे आहेत…
सामाजिक मागासलेपणाचे निकष, कंसात गुण
– जाती/ पारंपरिक व्यवसाय/ हस्तकला कारागिरी/रोजगार या कारणास्तव अशा वर्गाला सामाजिक स्तरात सामान्यतः कनिष्ठ समजले जाते. (२०)
– असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्य़ांपेक्षा अधिक स्त्रिया निर्वाहासाठी व्यवसाय/रोजगार/ मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेल्या आहेत. (२०)
– असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्य़ांपेक्षा अधिक पुरुष निर्वाहासाठी व्यवसाय/रोजगार/ मजुरीमधे हलक्या कामात गुंतलेले आहेत. (२०)
– असा वर्ग ज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही. (१०)
– असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्य़ांपेक्षा अधिक पुरुषांचा आणि दहा टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रियांचा बालविवाह केला जातो. (१०)
– अंधश्रद्धाळू प्रथा आणि अंधविश्वास सर्रास आढळणारा वर्ग. (१०)
– स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती सर्रास असणारा वर्ग. (१०)
एकूण गुण – १००
शैक्षणिक निकष
– पहिली ते दहावी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असणारा वर्ग – (१०)
– असा वर्ग ज्यामध्ये मुलींच्या शाळेतील गळतीचे प्रमाण पहिली ते दहावीदरम्यान राज्याच्या सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. (२०)
– असा वर्ग ज्यामध्ये दहावी उत्तीर्णांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. (१०)
– असा वर्ग ज्यामध्ये बारावी उत्तीर्णांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. (१०)
– असा वर्ग ज्यामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. (१०)
– असा वर्ग ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम जसे वकिली, वैद्यकीय, अभियांत्रिकी-तंत्रज्ञान, चार्टर्ड अकाउंटंट, मॅनेजमेंट, डॉक्टरेट अभ्यासक्रम शिकणाऱ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. (२०)
एकूण गुण ८०
आर्थिक निकष
– असा वर्ग ज्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबांपेक्षा २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. (२०)
– असा वर्ग ज्यामध्ये किमान ३० टक्के लोक ग्रामपंचायत कायद्यानुसार कच्च्या घोषित केलेल्या घरांमध्ये राहतात. (१०)
– असा वर्ग ज्यामध्ये अल्पभूधारक कुटुंबांची संख्या राज्य सरासरीच्या १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (१०)
– असा वर्ग ज्यामध्ये भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (१०)
– असा वर्ग ज्यांचे सभासद किंवा संस्थांच्या मालकीच्या शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्रोत नाहीत. (१०)
– असा वर्ग ज्यामध्ये उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (१०)
एकूण गुण ७०