Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनाचा भव्य सोहळा नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात होत आहे. या महामेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून देशभरातील काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या भूमीतून लोकसभा निवडणुकाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे.
मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकत्र झाला व हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानाने जुलमी, अत्याचारी ब्रिटिशांना देश सोडण्यास भाग पाडले. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे, आज पुन्हा महाराष्ट्राच्या भूमीतून देश वाचवण्याच्या लढाईचा एल्गार पुकारला जात आहे.
६० वर्षांच्या काँग्रेस सत्तेत पंडित जवाहरलाल नेहरुंपासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत भारताला एक महाशक्ती म्हणून उभे केले. पण दुर्दैवाने मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशाला रसातळाला नेले आहे. जाती-धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये भांडणे लावून देश अधोगतीकडे नेला आहे. आज देश विकून देश चालवला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे, त्यांना घाबरवले जात आहे. संसद सुरक्षेवर प्रश्न विचारले म्हणून १५० खासदारांना निलंबित केले पण काँग्रेस अशा कारवायांना भीक घालत नाही. जगातील बलाढ्य ब्रिटिशांना जसे देश सोडून जाण्यास भाग पाडले तसेच या हुकूमशाही भाजपालाही घरी बसवू. राहुलजी गांधी यांनी ‘डरो मत’ चा नारा दिला आहे, त्याच मार्गाने जावून भाजपाला सत्तेतून खाली खेचू, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
आज महागाई, शेतकरी, कामगार, तरुणांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. सरकारी यंत्रणा वेठीस धरल्या आहेत. सरकारच्या विरोधात आवाज काढणाऱ्यांना शिक्षा केली जात आहे. देश कठीण प्रसंगातून जात आहे त्याला वाचवण्यासाठी काँग्रेसची ही लढाई असून देशाला वाचवणे हीच काँग्रेसची गॅरंटी आहे. २८ तारखेच्या नागपुरच्या महामेळासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून परिवर्तनाचा एल्गार या महामेळाव्यातून पुकारला जाणार आहे, या परिवर्तनासाठी ‘हम तैयार है’, असे नाना पटोले म्हणाले.