Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘डेडलाइन’ हुकवली; आता उद्घाटनही…
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले. येत्या शनिवारी (३० डिसेंबर) अयोध्येतील विमानतळही प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. पुण्याच्या नव्या टर्मिनलचे सर्व काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्ये उद्घाटन होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये हे काम अर्धवट होते. त्यानंतर नोव्हेंबर आणि आता डिसेंबर संपत आला, तरी शेवटच्या टप्प्यातील काही कामे सुरूच असल्याचा दावा विमानतळ प्रशासन करीत आहे. खरे पाहता टर्मिनलची सर्व कामे पूर्ण झाली असून, उद्घाटनासाठी संबंधितांना वेळच मिळत नसल्याने टर्मिनल खुला करण्याचा ‘मुहूर्त’ पुढे ढकलला जात आहे.
टर्मिनलचा वापर पुढील वर्षातच?
पुणे विमानतळावरून दररोज १८० ते १९० विमानांची उड्डाणे होतात. दैनंदिन स्वरूपात २६ ते ३० हजार प्रवाशांचा विमानतळावर राबता असतो. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची वाढती संख्या पाहता जुन्या टर्मिनलवरील सुविधा कमी पडू लागल्याने नवीन टर्मिनलचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. बांधकाम पूर्ण होऊन चालू वर्षात टर्मिनल कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र, एकंदरीत विमानतळ प्रशासनाचा कारभार पाहता पुणेकरांना पुन्हा नव्या वर्षातच नव्या टर्मिनलचे ‘उड्डाण’ पाहण्याची वेळ येणार आहे.
लोकप्रतिनिधी नसल्याचा फटका
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचे खासदारपद अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे पुण्याचे प्रश्न केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिले जात नाहीत. आणि त्याचाच फटका पुण्याला बसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पुण्याचे प्रतिनिधित्त्व करणारा लोकप्रतिनिधीच नसल्याने पाठपुरावा करण्यात विमानतळ प्रशासन कमी पडते आहे.
विलंबाचा प्रवाशांना फटका
पुणे विमानतळाचा हिवाळी हंगाम (विंटर सीझन) सुरू झाला आहे. हिवाळी हंगामाध्ये फक्त विमानाची एक फेरी वाढविण्यात आली. विंटर सीझनमध्ये विमानांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. जुन्या टर्मिनलची प्रवासी क्षमता कमी आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यास विमान फेऱ्या वाढविणे सोपे जाणार आहे. मात्र, त्यासाठीची प्रतीक्षा लांबतच चालल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.
अधिकाऱ्यांचे मौन
विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्याकडे नव्या टर्मिनल उद्घाटनाबाबत विचारणा केली, असता त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळत नाही. विमानतळाबाबत कोणतीही माहिती माध्यमांना देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे पुणे विमानतळाची नेमकी जबाबदारी कुणाची, पुण्याला खासदार नसल्याने प्रत्येक वेळी नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी संपर्क साधायचा का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
कसे आहे नवीन टर्मिनल?
६० हजार चौरस फूट
एकूण क्षेत्रफळ
~ ५२५ कोटी
अपेक्षित खर्च
एक कोटी वीस लाख
वार्षिक प्रवासीक्षमता