Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अंतरवाली सराटी ते मुंबई हे अंतर मनोज जरांगे पायी पार करणार आहेत. त्यांच्यासोबत येणाऱ्या मराठा आंदोलकांनी कशाप्रकारे तयारी करावी, याबद्दल मनोज जरांगे यांनी अनेक सूचना दिल्या. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर मराठा मोर्चा हा प्रथम बीडमध्ये दाखल होईल. त्यानंतर हा मोर्चा जालना-शहागड,-गेवराई-अहमदनगर-शिरुर-शिक्रापूर, रांजणगाव-खराडी-शिवाजीनगर-पुणे-लोणावळा-पनवेल- वाशी-चेंबूर-शिवाजी पार्क असा प्रवास करत आझाद मैदानात दाखल होतील. अंतरवाली सराटीहून मुंबईकडे जाताना मराठा आंदोलकांची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी होईल. या तुकडीच्या प्रमुखांनी आपापल्या लोकांची काळजी घ्यावी. कोणत्याही तुकडीतील लोक उद्रेक किंवा जाळपोळ करणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित तुकडी प्रमुखाची असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मुंबईला जाण्यासाठी सगळी रसद सोबत घ्या: जरांगे
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना मुंबईला जाण्यासाठी जय्यत तयारी करण्याच्या सूचना दिल्या. अंतरवाली सराटीवरुन निघाल्यानंतर मुंबईला जाईपर्यंत रस्त्यामधील गावांकडून आपल्या खाण्यापिण्याची सर्व सोय होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्यासोबत नेलेली खाण्यापिण्याची शिदोरी मुंबईतच उघडावी लागेल. तरीही मराठा आंदोलकांची संख्या मोठी असल्यास एखाद्या गावात खाण्यापिण्याची सोय होऊ न शकल्यास मोर्चेकऱ्यांनी तयारीत राहावे. आपल्यासोबतच्या वाहनात स्वयंपाकाची सामुग्री आणि गरजेच्या सर्व गोष्टी ठेवा. आपलं वाहन हेच आपलं घर करा. ऊन, पाऊस, थंडी यापासून रक्षण करण्यासाठी याच वाहनांचा वापर करा. अंतरवाली ते मुंबई या प्रवासात पाय दुखले किंवा आजारी पडलात तरी औषधाच्या गोळ्या सोबत ठेवा, आपल्याला न थांबता मुंबईला जायचे आहे. मुंबई गाठायची या एकाच ध्येयाने वाटचाल करा. मराठ्यांनो मुंबईत अशी धडक मारा की, कोणी अशी धडक मारली नसेल. मुंबईत गेल्यानंतर यश मिळाल्याशिवाय माघारी यायचे नाही. त्यामुळे शेतीची कामं उरकून मराठा बांधवांनी ताबडतोब मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज व्हावे.सणवार, उत्सव, लग्न ही नंतर करता येतील. हा आपला शेवटचा लढा आहे. आतापर्यंत राज्यभरात मराठ्यांच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. जालन्यात एका नोंदीवर ७० मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. या हिशोबाने ५४ लाख नोंदीवर २ कोटी मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. कुणबी नोंदींचा ५४ लाख हा आकडा मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी पुरेसा आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
कोणताही विचार न करता मराठा बांधवांनी घराबाहेर पडावे: जरांगे पाटील
हा आपला शेवटचा लढा असल्यामुळे मराठा बांधवांनी कोणताही विचार न करता गावाबाहेर पडावे. आरक्षण ही आपल्या लेकरांसाठी आयुष्यभराची भाकरी ठरेल. गावातील पोरं गाड्या घेऊन मुंबईला येत असतील तर गावकऱ्यांनी त्यांच्या डिझेलचा खर्च उचलावा. आम्ही मुंबईत खिंड लढवू. गावातील थांबलेल्या लोकांनी इकडे धान्य संपले तर ट्रकने आणखी धान्य इकडे पाठवावे आणि माघारी गावाकडे जावे. अशा दोन्ही बाजूंनी आपल्याला खिंड लढवता येईल, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिला.