Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
२०२३मध्ये दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि बॉलिवूड कलाकारांची जोडी सुपरहिट ठरली. सिनेमा व्यावसायिकांच्या मते, ‘जवान’ आणि ‘अॅनिमल’ यासारख्या सुपरहिट सिनेमांच्या पावलावर पाऊल ठेवत आगामी वर्षातही हिंदीतील अनेक बडे कलाकार दाक्षिणात्य दिग्दर्शकांबरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहेत. विशेष म्हणजे उपरोक्त दोन्ही सिनेमांच्या सिक्वेलची घोषणा अगोदरच करण्यात आली आहे. याशिवाय, इतर बॉलिवूड सुपरस्टार्सदेखील साऊथच्या दिग्दर्शकांसोबत काम करणार असल्याचं कळतंय. यात प्रामुख्यानं सलमान खानचं नाव अग्रस्थानी आहे. कारण यावर्षी त्याचा सिनेमा यशस्वी ठरला नाही. त्यामुळे आता सलमानला दाक्षिणात्य दिग्दर्शकसोबत काम करायचं असल्याचं कळतंय. ‘शेरशाह’सारखा सुपरहिट चित्रपट देणारा तमिळ दिग्दर्शक विष्णू वर्धनसोबत सलमाननं ‘ऑपरेशन बुल’ या चित्रपटावर काम सुरू केल्याचं समजतंय. दुसरीकडे, अक्षयकुमार पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत चित्रपट करणार असल्याचं कळतंय.
दाक्षिणात्य पाऊलखुणा…
‘साऊथचा दिग्दर्शक’ आणि ‘बॉलिवूडचा हिरो’ हा ट्रेंड नवीन नाही. सुप्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक मणिरत्नम यांनी शाहरुख खान आणि मनीषा कोईराला यांच्या ‘दिल से’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. तसंच तमिळ दिग्दर्शक ए. आर. मुरुगौस यांनी आमिर खानसोबत ‘गजनी’ हा चित्रपट बनवून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, जो त्याच्याच तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. यानंतर मुरुगौस यांनी अक्षयकुमारसोबत ‘हॉलिडे’ हा चित्रपट बनवला, जो त्याच्या तमिळ चित्रपट ‘थुप्पकी’चा रिमेक होता. याशिवाय, खिलाडी कुमारच्या ‘गब्बर इज बॅक’ या हिट चित्रपटाचं दिग्दर्शन राधा कृष्ण जगरलामुडींनी केलं होतं. शाहरुख, आमिर आणि अक्षयच नाही तर सलमान खाननंही दाक्षिणात्य दिग्दर्शकांसोबत काम केलं. २००८ साली आपल्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात असलेल्या सलमान खानच्या पुनरागमनाचं श्रेय त्याच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटाला जातं. या सिनेमाचा दिग्दर्शन प्रभुदेवानं केलं होतं. नंतर प्रभुदेवाने सलमान खानचा ‘दबंग ३’, ‘राधे’ आणि अक्षयकुमारचा ‘राऊडी राठौर’ व ‘सिंग इज किंग’सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. तर सलमानचा ‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट मल्याळम दिग्दर्शक सिद्दीकीनं केला होता.