Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नारायण राणे हे भाजपला मुंबई जिंकून देऊ शकतील?

12

राज्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं महापालिकांची तयारी सुरू केली आहे. त्यातही मुंबई महापालिकेची निवडणूक नेमकी कशी होणार, याकडं सर्वाचं लक्ष असेल. कारण, राज्यातील सध्याचे दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष मुंबई जिंकण्यासाठी अटीतटीची लढाई लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी लागलेली वर्णी हा भाजपच्या याच रणनीतीचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे. भाजपनं खेळलेली ही चाल यशस्वी होईल का? नारायण राणे भाजपला मुंबई जिंकून देऊ शकतील का? याचा घेतलेला हा वेध…

​पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप

मुंबई महापालिकेची निवडणूक ही आजवर शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी होत आली आहे. २०१७ ची निवडणूक त्यास अपवाद ठरली होती. राज्यात सत्तेत असतानाही शिवसेना व भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी भाजपनं शिवसेनेला अटीतटीची लढत दिली होती. मात्र, निकालानंतर भाजपनं नमतं घेत शिवसेनेला महापालिकेत महापौर बसवण्याची संधी दिली. अर्थात, त्यावेळी राज्यातील सत्तेत काही गडबड होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र युती तुटल्यानंतर आणि शिवसेनेनं थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसार थाटल्यानंतर भाजप निर्णायक लढाईसाठी सज्ज झाला आहे. नारायण राणे हे त्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा भाजपचा होरा आहे.

नारायण राणेच का?

मागील निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला ‘काँटे की टक्कर’ दिली होती. मात्र, स्वबळावर सत्ता मिळवण्याचे सोडाच, मुंबईत भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागाही मिळवता आल्या नव्हत्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाही भाजपला ते शक्य झालं नव्हतं. ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपला एका आक्रमक नेतृत्वाची गरज होती. ती उणीव राणे भरून काढतील, असं भाजपला वाटतं. भाजपनं अधिकृतपणे कुठलीही घोषणा केली नसली तरी राणे हे मुंबईत भाजपचे स्टार प्रचारक असणार हे आता स्प्ष्ट झालं आहे.

​मुंबई हेच कार्यक्षेत्र

राज्य पातळीवर भाजपमध्ये अनेक नेते असले तरी मुंबईतील मतदारांना आकर्षित करेल, असा एकही नेता नाही. मुंबईतील कोकणी माणूस हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे. नारायण राणे हे मुंबईतील कोकणी माणसाला भाजपकडं वळवू शकतात. सुरुवातीच्या काळात राणेंचं कार्यक्षेत्र मुंबई होतं. ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळं महापालिकेतील आणि मुंबईतील राजकारणाच्या सगळ्या खाचाखोचा त्यांना माहीत आहेत. ते शिवसेनेच्या कारभाराला नेमकेपणाने लक्ष्य करू शकतात, असाही एक अंदाज आहे.

​नारायण राणे आणि राज ठाकरे

मुंबई महापालिका निवडणुकीतील मनसेची भूमिका व कामगिरी निवडणूक निकालावर परिणाम करणारी ठरणार आहे. भाजप-मनसे युतीची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. ही युती झाली नाही तरी भाजप व मनसे या दोन्ही पक्षांचे लक्ष्य शिवसेना हेच असणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्ष परस्परांवर टीका न करता निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पडद्यामागे बरंच काही घडू शकतं. अशा वेळी देखील राणे हे भाजपसाठी उपयुक्त ठरू शकतात. नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर राग असला तरी राज ठाकरेंशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. हे संबंध महापालिका निवडणुकीत छुप्या राजकीय सहकार्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

​१५ वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय!

नारायण राणे हे अभ्यासू, आक्रमक आणि संघटन कुशल नेते आहेत, याबाबत कुणाचंही दुमत नाही. शिवसेना सोडल्यानंतरही काही वर्षे राणेंचा राजकीय प्रभाव टिकून होता. त्या जोरावर त्यांनी काँग्रेसमध्ये मंत्रिपद मिळवलं. मात्र, त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारता आली नाही. उलट उत्तरोत्तर त्यांचा प्रभाव कमी होत गेल्याचं दिसतं. सिंधुदुर्गात त्यांना पराभव पत्करावा लागला. मुंबईत वांद्रे येथील विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. राणेंचे पुत्र नीलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. केंद्रीय मंत्री झाल्यामुळं त्यांचं वजन वाढल्याचं बोललं जात असतानाच, त्यांना अटकही करण्यात आली. हे सगळं बघता नारायण राणे यांचा मुंबईतील मतदारांवर कितपत प्रभाव पडेल, याबाबत साशंकता आहे.

​शिवसेनेचं संघटनात्मक जाळं

मुंबई महापालिकेत शिवसेनेला मात देणं ही सहजसोपी गोष्ट नाही. मागील निवडणुकीत भाजपनं सर्व प्रकारची ताकद लावूनही ते शक्य झालं नाही. शिवसेनेची मुंबईतील संघटनात्मक बांधणी हे त्याचं मुख्य कारण आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईकरांना सहज उपलब्ध असतात. गटप्रमुखांपासून ते शाखाप्रमुखांपर्यंत प्रत्येकाचा सामान्यातल्या सामान्य माणसाशी संपर्क असतो. गेल्या काही वर्षांपासून युवा सेनेनंही मुंबईत चांगलंच बस्तान बसवलं आहे. त्यामुळं मनसेकडं गेलेला युवा वर्ग पुन्हा शिवसेनेकडं आला आहे. मुंबईत गेल्या वर्षभरापासून शिवसेनेच्या नगरसेवकांनी छोटीमोठी कामं सुरू केली आहेत. त्यातच नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळं यावेळच्या निवडणुकीत शिवसैनिक अधिक त्वेषानं उतरण्याची शक्यता आहे.

​मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी संघटनेची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहेच, शिवाय मुख्यमंत्री म्हणूनही ते लोकप्रिय ठरले आहेत. करोना काळात त्यांनी संयमानं व खंबीरपणे केलेलं कामही चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यांच्या या प्रतिमेचा फायदाही शिवसेनेला निश्चितच होणार आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर नेतृत्वाखाली यावेळी मुंबईची निवडणूक लढविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं युवा शिवसैनिकही जोमानं कामाला लागण्याची शक्यता आहे. परिमाणी नारायण राणेंना व पर्यायानं भाजपसाठी ही निवडणूक हे मोठं आव्हान असणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.