Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शेतकरी चिंतेत! धानाचे दर कोसळले ६०० रुपयांनी, सध्या खुल्या बाजारात प्रती क्विंटलचा भाव काय?

9

राजू मस्के, भंडारा : केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या किंमतीवरून व्यापारी संघटनांना इशारा देत साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला. नंतर वाढत्या महागाईवर उतारा म्हणून २५ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा एकत्रित परिणाम म्हणून खुल्या बाजारात धानाचे दर प्रती क्विंटल ६०० रुपयांची कोसळले आहेत. काही दिवसांपूर्वी ३ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल दराने धानाची विक्री होत होती. हे दर आता २ हजार ७०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या कोसळलेल्या दरामुळे धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि कोकणात धानाचे उत्पादन होते. मागील काही वर्षांत धान लागवडीचा खर्च दुप्पट झाला आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी धानाला योग्य भाव मिळणे अपेक्षित होते. यावर्षी केंद्र सरकारने अ दर्जाच्या धानाला २ हजार २०३ रुपये तर ब दर्जाच्या धानाला २ हजार १८३ रुपयांचा दर घोषित केला. दिवाळीनंतर धानाची कापणी सुरू असताना अवकाळी पावसाचा फटका बसला. अनेकांचे कापून ठेवलेले धान भिजले तर काही ठिकाणी कडपा पाण्यावर तरंगल्या. अनेक शेतांमधील धानाला अंकुर फुटले. नेमक्या याच कालावधीत धानाचे दर कधी नव्हे इतके वाढले. बारीक धानाचे दर ३ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले होते. तर ठोकळ धानाला २ हजार ३०० ते २ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. ही दरवाढ धानविक्रीच्या व्यवहारात ऐतिहासिक मानली गेली. या कालावधी धानविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात लाभ झाला. परंतु, अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची मळणी दोन ते तीन आठवडे लांबणीवर पडली. तोपर्यंत धानाचे दर हळूहळू कमी होत गेले. सध्याच्या दरातून शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. अनेक व्यापारी अवकाळी पावसात कडपा सापडल्यामुळे धानाची मिलिंग करताना तुकडा अधिक प्रमाणात पडत असल्याचे कारण सांगूनही कमी दराने धान खरेदी करीत असल्याचे शेतकरी सांगतात.

नेमके काय घडले?

– नोव्हेंबर महिन्यात लगतच्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक झाल्या.
– या निवडणुकीत भाजपने धानाला ३ हजार १०० रुपये क्विंटलचा भाव देण्याची घोषणा झाली.
– भाजपने दोन्ही राज्यात बाजी मारल्यानंतर पूर्व विदर्भातही धानाचे भाव वाढले.
– वाढलेल्या धानाच्या दरापाठोपाठ तांदळाचे दरही वाढले.
– बिगर बासमती तांदळाची किंमत ५० रुपये किलोपर्यंत पोहोचली.
– केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या किंमतीवरून व्यापारी संघटनांना इशारा दिला.
– साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला.
– आता २५ रुपये प्रती किलो दराने सरकार तांदूळ उपलब्ध करणार.
– या निर्णयाचा फटका धानाच्या दरावर पडला आहे.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलासह डाळींचेही भाव उतरणीला, जाणून घ्या नवे दर…
छोट्या व्यापाऱ्यांकडून व्यवहार ठप्प

धानाच्या दरातील तफावत वाढू लागली आहे. चढ्या दराने धानाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे संकट निर्माण झाले आहे. अनेकांनी गोदामांमध्ये धान साठवून ठेवला आहे. येत्या १५ दिवसांत दर वाढणार ही आशा त्यांना होती. पण, सरकारने २५ रुपये किलोने तांदूळ देण्याची घोषणा केल्याने या लहान व्यापाऱ्यांमध्ये धास्ती वाढली आहे. सहाशे रुपये प्रती क्विंटलची तफावत कशी भरून काढावी, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने धानाचे भाव पडले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत दोन रुपये किलो किंवा काहींना मोफत धान्य मिळत असल्याने खुल्या बाजारपेठेत मागणी कमी होत आहे. महागाई वाढू नये म्हणून शासनाने तांदळाचे दर कमी केले. परिणामी धानाचे दर कमी झाले आहेत.-कृष्णा पराते, धान उत्पादक

दरपत्रक…
(प्रती क्विंटल)
आधारभूत…
ए ग्रेड : २,२०३ रुपये
बी ग्रेड : २,१८३ रुपये

पूर्वी खुल्या बाजारात…
ए ग्रेड : ३,३०० रुपये
बी ग्रेड २,३०० रुपये

सध्या खुल्या बाजारात…
ए ग्रेड : २,७०० रुपये
बी ग्रेड : २,००० रुपये

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.