Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आणि विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर या दोघांनीही पुणे लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्वाकडे गळ घातली आहे. माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी शहरभर बॅनरबाजी करत आपणच मनसेचे लोकसभेचे उमेदवार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
आता दुसरीकडे मनसेचे साईनाथ बाबर यांनी देखील आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात आता पुढच्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे मनसेकडून या दोन जिगरी मित्रांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार की राज ठाकरे तिसऱ्याच नावाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेचे प्रभारी म्हणून अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्या अनुषंगाने अमित ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. त्याचा अहवाल राज ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता स्वतः राज ठाकरे पुढच्या आठवड्यात पुण्यात बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. त्यामुळे मनसे आपला पहिला खासदार पुण्यातून निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचं दिसतं आहे.
मनसेमधून वसंत मोरे गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत. त्याबाबत वारंवार त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी माझी तयारी पूर्ण झाली असून पक्षाने तिकीट दिले तर पुण्यात मनसेचाच खासदार होणार असल्याचा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे. त्यासंदर्भात ‘पुण्याची पसंत मोरे वसंत’ अशा आशयाची बॅनरबाजी देखील वसंत मोरे यांच्याकडून शहरभर करण्यात आली आहे.
मात्र आता मनसेमधूनच वसंत मोरे यांचे कधीकाळचे जिगरी मित्र असलेले साईनाथ बाबर हे देखील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. याबाबत बोलताना साईनाथ बाबर यांनी पक्षांनी जर आपल्याला संधी दिली तर आपण निवडणूक लढवणार आणि जिंकून देखील येणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
त्यामुळे आधी अमित ठाकरे आणि आता राज ठाकरे या या दोघांनीही पुणे लोकसभेत लक्ष घातल्यानंतर पुण्यात मनसेचा उमेदवार कोण असणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News