Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गोंदिया जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी परतलेल्या रानटी हत्तींचा गडचिरोलीच्या उत्तर भागात धुमाकूळ सुरू असून रविवारी पाथरगोटा येथे रानटी हत्तींन्नी पाच घरे उध्वस्त केली होती. त्यात नागरिकांना अन्न,वस्त्र, निवार्यापासून बेघर केले तसेच शेतातील मका, तूर, बरबटी व धान पिकाची नुकसान देखील या हत्तींनी केली होती.आता शुक्रवार (२९ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास पुन्हा एका वृद्ध महिलेचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबरच्या मध्यरात्री शंकरनगर येथील जंगलालगत असलेल्या घरात मंडल कुटुंब झोपी गेलेले असताना हत्तींच्या आवाजाने ते जागे झाले. आपल्या जवळपास हत्ती आल्याचे त्यांना कळताच जीव वाचविण्यासाठी ते गावाच्या दिशेने जाण्यास निघाले. मात्र, कौशल्या मंडल हत्तींच्या तावडीत सापडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी पती राधाकांत मंडल, मुलगा हरदास आणि सून भगवती यांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली मात्र ते काहीही करू शकले नाही.या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून नागरिकांनी तात्काळ हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
तीन महिन्यांत चौथा बळी
मागील तीन महिन्यात रानटी हत्तींच्या हल्ल्यात चार जण ठार झाले आहेत. १६ सप्टेंबरला आरमोरी तालुक्यातील पळसगाव-डोंगरगाव रस्त्यावर एका हत्तीने सुधाकर आत्राम नामक वनविभागाच्या वाहनचालकास ठार केले होते. १७ ऑक्टोबरला गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील शेतकरी होमाजी गुरनुले, तर २५ नोव्हेंबरला गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथील मनोज येरमे नामक शेतकऱ्यास रानटी हत्तींनी ठार केले होते. त्यानंतरची ही चौथी घटना आहे.