Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या कामास गती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार बैठक होऊन वरील विषयांना मान्यता देण्यात आली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, दिलीप वळसे-पाटील, आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, नितीन भुसारा, वित्त विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, वास्तुविशारद देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वासाळी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून स्मारक मंजूर झाले आहे. यासंदर्भात यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८८ कोटी ८४ लाख रुपयांचे स्मारक उभारणे व दुसऱ्या टप्प्यात उर्वरित काम करण्यासाठी ९६ कोटी रुपये इतक्या रकमेस मंजुरी देण्याचे निश्चित झाले होते.
त्याचबरोबर या स्मारकाच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या कळसूबाई शिखरावर ये-जा करण्यासाठी रोप वे उभारण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार त्याचा २११ कोटी रकमेचा स्वतंत्र डीपीआर तयार करून केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत मंजुरीसाठी पाठविण्यात यावा, असा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत झाला होता. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा झाली. त्यामुळे स्मारकाचा सर्व खर्च सुमारे ४८३ कोटी रुपयांपर्यंत करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली.
आदिवासी विकास विभागामार्फत व्हावे काम
या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आदिवासी विभागामार्फत करण्याचे या बैठकीत ठरले आहे. स्मारकाच्या कामकाजासाठी एक समिती बनविण्याचे ठरले असून, त्यात पर्यटन व ग्रामविकास सचिव, वास्तुविशारद, आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, जिल्हाधिकारी या समितीत असणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीची चावी आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामास निधी कमी पडू नये व कामातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्या दालनात बैठक घेण्याची आग्रही मागणी मी केली होती. त्यामुळे या बैठकीत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. आदिवासी बांधवांची अस्मिता या स्मारकाच्या माध्यमातून जपली जाणारच आहे. मात्र, या भागात पर्यटनवृद्धी होऊन या बांधवांना रोजगारही मिळणार आहे.
माणिकराव कोकाटे, आमदार सिन्नर
आज स्मारक समितीची बैठक
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारण्यासाठी जागेची निश्चिती करणे व इतर बाबींची चर्चा करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक शनिवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता कोरी भंडारदरा रस्त्यावर खेड येथे अनिल वाजे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. बैठकीचे निमंत्रण खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आमदार सुनील भुसारा, आमदार शांताराम मोरे, आमदार दिलीप बोरसे, आमदार श्रीनिवास पाटील आदींना देण्यात आले आहे.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News