Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपूर्वी जुन्नर येथून मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर शनिवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली. या वेळी झालेल्या सभेत पवार बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार रवींद्र धंगेकर, संजय जगताप, अशोक पवार, माजी आमदार कमल ढोले-पाटील, मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मांडायचा प्रयत्न केला; पण आजचे सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पाहायला तयार नाही. मी नुकताच अमरवतीला गेलो होतो. तेथे दहा दिवसांत २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याबाबत वर्तमानपत्रात बातमी वाचली. देशाची भूक भागविणारा शेतकरी आत्महत्या करतो, ही गोष्ट छोटी नाही. मी कृषिमंत्री असताना शेतकरी आत्महत्येची घटना घडली होती. त्या वेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना घेऊन लातूर, यवतमाळ आणि वर्ध्याला गेलो होतो. तिथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तेथून दिल्लीला गेल्यावर लगेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली.’
सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी गांभीर्य नाही. प्रश्न न सुटल्यास ‘ट्रिपल इंजिन’ सरकारमधील मंत्र्यांना लोक रस्त्यावरून फिरू देणार नाहीत. सध्याच्या सरकारला ‘पॉलिसी पॅरालिसेस’ झाला असून, त्यांच्या धोरणांमुळे केवळ ठेकेदारच मोठे झाले आहेत.
– सुप्रिया सुळे, खासदार
मुख्यमंत्री म्हणतात हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. मात्र, केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी करून २३ दिवस झाले. तरीही राज्य सरकारमधील एकाही मंत्र्याने केंद्र सरकारकडे प्रश्न मांडले नाहीत. त्यांना पालकमंत्री पद, मंत्रिमंडळ विस्तार यासाठी दिल्लीला धाव घेता येते; पण शेतकऱ्यांसाठी नाही.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार
‘शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न’
‘आक्रोश मोर्चानंतर परिस्थिती न सुधारल्यास हल्लाबोल मोर्चा काढावा लागेल. कांदा आणि साखरेच्या दरवाढीने शेतकऱ्याला चार पैसे मिळतील, असे वाटले होते. मात्र, केंद्र सरकारने कांद्याची निर्यात आणि इथेनॉल उत्पादन बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे बाळासाहेब थोरात म्हणाले. महागाई वाढल्यास शहरातील नागरिकांना रास्त दरात वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने निश्चित पावले उचलावीत. मात्र, त्यासाठी सरकारने शेतकऱ्याच्या खिशात हात घालू नये,’ असे आवाहनही त्यांनी केले.
‘हवा तेज चल रही है, अजितराव…’
‘हवा बहुत तेज चल रही है, अजितराव, टोपी उड जायेगी,’ असे म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. पवार यांनी नुकतेच ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना पराभूत करणारच,’ असे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी भाषणात पवार यांची मिमिक्री केली. ‘आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही आल्यास आधी तुम्हीच पडाल,’ असा इशारा राऊत यांनी दिला. राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्राने देशाचे पोट भरले आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न आहे. राज्यात येणारा प्रत्येक उद्योग गुजरातला जात आहे. तुम्ही उद्योग घेऊन जाऊ शकता; पण मराठी माणसाचे मनगट नाही. आम्ही पुन्हा लढू आणि साम्राज्य उभे करू.’
Read Latest Maharashtra News And Marathi News