Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संस्थेच्या गंगापूररोडवरील संकुलात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीपासून संचालक मंडळाला विविध गोष्टींचा जाब विचारणाऱ्या सदस्य मनोज बुरकुले यांनी नोकरभरतीत संचालकांनी दहा लाखांचा धनादेश व तीन लाख रुपये रोख घेत अपहार केल्याचा मुद्दा उपस्थित केला. याबबातचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धनादेश व पैसे परत का दिले, असा प्रश्नही त्यांनी विचारला. हे एकताच संतप्त संचालक मंडळाने बुरकुले यांच्याकडे धाव घेत, त्यांच्यावर खुर्चा भिरकावल्या. संचालक मंडळ व अन्य सदस्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर पोलिस आणि अन्य सभासदांनी बुरकुले यांना संस्थेच्या बाहेर नेले. काही वेळानंतर बुरकुले पुन्हा सभास्थळी आले.
संस्थेच्या सभासद स्मिता बोडके यांनी संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत वंजारी विकास परिषदेमध्ये साडेसहा कोटींचा घोटाळा केल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी संस्था आणि वंजारी विकास परिषद यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट करताच, स्मिता बोडके यांनी हा मुद्दा मागे घेतल्याचे स्पष्ट केले. ‘आयटीआय’मधील लेखा परीक्षणातील अनियमितता, वारसा सभासद, संस्थेच्या विविध ठिकाणच्या जागा एनए न करणे, संस्थेच्या संकुलांना संस्थेसाठी योगदान देणाऱ्यांची नावे देण्याचा ठराव दुलर्क्षित करणे यासह अनेक मुद्दे सभेच्या सुरुवातीलाच सदस्यांनी उपस्थित केले. संस्थेच्या संकुलाला संस्थेचे माजी अध्यक्ष दिवंगत तुकाराम दिघोळे व सिन्नरच्या कॉलेजला संस्थेच्या कामात योगदान देणारे सुदाम सांगळे यांचे नाव देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पुढील दहा वर्षांसाठी संस्थेचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना ज्येष्ठ सभासद शिवाजी मानकर यांनी केली.
विविध सभासदांनी केलेल्या मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. पी. आर. गिते, सहचिटणीस तानाजी जायभावे, विश्वस्त दिगंबर गिते, दामोदर मानकर, सुभाष कराड, बाळासाहेब वाघ, संचालक विलास आव्हाड, विष्णू नागरे, सुरेश घुगे, सुधाकर कराड, अशोक भाबड, रामनाथ बोडके, श्याम बोडके महिला संचालिका शोभा बोडके यासह अन्य सभासद उपस्थित होते.
सभासदत्वासाठी विशेष सभा
सभेच्या सुरुवातीला मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व देण्यावरून तसेच नवीन सभासदत्वावरून संचालक मंडळाला जाब विचारण्यात आला. यासाठी घटना दुरुस्ती गरजेची असल्याचे कारण अध्यक्षांनी दिल्यानंतर, संतप्त सभासदांनी अन्य शिक्षण संस्थांची उदाहरणे देत, तातडीने याबबात निर्णय घेण्याची मागणी केली. सभासदत्वाच्या निर्णयासाठी विशेष सभा आयोजित करणार असल्याचे अध्यक्ष थोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मनोज बुरकुले यांनी नोकर भरतीबाबतच्या आरोपात थेट पदाधिकाऱ्यांनाच जबाबदार धरल्यामुळे हा प्रकार घडला. या आरोपाबाबत व्हायरल झालेल्या क्लिपमधील आवाज कोणाचा आहे, त्याची पडताळणी केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. ‘आयटीआय’मधील १ कोटी ९१ लाखाचा गैरप्रकार आमच्या काळात घडलेला नाही. परंतु त्यापैकी १ कोटी १० लाख वसुली आम्ही केली आहे.- पंढरीनाथ थोरे, अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था