Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवी मुंबईसाठी २०२४ वर्ष ठरणार भारीच; विविध प्रकल्प येणार पूर्णत्वास, काय-काय सुविधा मिळणार?

8

मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई : सरत्या वर्षात नवी मुंबई महापालिकेचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात आले असून, अनेक प्रकल्प लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही महत्त्वाचे प्रकल्प २०२४ या वर्षात पूर्ण होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नावलौकिकात भर पडणार आहे. यामध्ये सायन्स पार्क, ऐरोलीतील नाट्यगृह यासह वाशीतील डेपोसारख्या महत्त्वाच्या कामाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह संकुलात उभारलेल्या ग्रंथालयाचे लोकार्पणही नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात होणार आहे.

वर्ष सरतानाच, नवी मुंबई महापालिकेला ३१ वर्षे पूर्ण होत असून नववर्षात ही महापालिका ३२व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ३२ वर्षांत महापालिकेची कामगिरी कौतुकास्पद आहे. शहरातील सोयीसुविधा, विविध विकास प्रकल्प उभारून पालिकेने आपले नाव शेजारच्या अन्य महापालिकांच्या तुलनेने उंचावले आहे. देशातील स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सतत अव्वल येऊन आपले वेगळेपण दाखवून देताना, या महापालिकेने देशात नाव कमावले आहे. करोनानंतर, महापालिकेच्या रखडलेल्या अनेक महत्त्वाच्या विकासकामांना, प्रकल्पांना चालना मिळाली. हे प्रकल्प अंतिम टप्प्यात असून नववर्षात नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

१ सायन्स पार्क

नेरूळमधील वंडर पार्कच्या आवारात उभारला जाणारा महापालिकेचा हा सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प आहे. तब्बल १२४ कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जात आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात झाली. वायू, जल, हवा या तत्त्वांवर आधारित असलेल्या या विज्ञान केंद्रात, पर्यावरण, जीवन ऊर्जा, रोबो, अंतराळ या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश असणार आहे. या विज्ञान केंद्रात भविष्यातील मानवी जीवनाचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिवाय, भविष्यातील ऊर्जास्रोत, मानवी जीवन यांचे चित्र साकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या तीन मजली इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात असून, हे काम पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी २०२४ ही मुदत आहे. तोपर्यंत सायन्स पार्कच्या उभारणीसह सर्व काम पूर्ण होण्याचा विश्वास महापालिकेला आहे.

२ ऐरोलीतील नाट्यगृह प्रगतिपथावर

महापालिकेच्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर, ऐरोली सेक्टर ५ येथे नवीन नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. अनेक वर्षांच्या रखडपट्टीनंतर, मागील दोन वर्षांत या कामाला गती मिळाल्याने, २०२४ अखेरीस ते पूर्ण होऊन २०२५मध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. यासाठी ७० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. एकूण ८६० प्रेक्षकांची क्षमता, वाहन पार्किंग सुविधा, अत्याधुनिक नाट्यगृह ही या नाट्यगृहाची वैशिष्ट्ये आहेत.

३. वाशी डेपोचा वाणिज्यिक विकास

वाशी डेपोचा वाणिज्यिक विकास करून तिथे २४ मजली इमारत उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या माध्यमातून परिवहनचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे महापालिकेचे विशेष लक्ष आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचा खर्च २०० कोटींच्या घरात आहे. आता इमारतीची उभारणी जवळजवळ पूर्ण झाली असून, खिडक्या, दरवाजे, फर्निचर, वीजजोडणी, सुरक्षेची कामे शिल्लक आहेत. मात्र नववर्षात या इमारतीतून वाशी बस डेपोचे काम सुरू केले जाणार आहे. वाशी सेक्टर २८मधील महापालिकेचा सर्वात पहिला तरणतलावाचे काम प्रगतिपथावर आहे.
छत्रपती संभाजीनगरसाठी २०२४ वर्ष ठरणार ‘मोस्ट हॅपनिंग इयर’; पालिकेकडून विविध नव्या योजनांना सुरुवात
४. भावे नाट्यगृहातील लायब्ररीचे लोकार्पण

वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी वाचनालये, ग्रंथालये सुरू करण्यात आली असून, वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सर्व सोयीसुविधायुक्त वाचनालय उभारण्यात आले आहे. याची उभारणी पूर्ण झाली असून, नववर्षात पाहिल्याच महिन्यात हे वाचनालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे नाट्यगृहात येणाऱ्या नागरिकांना वाचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ऑडिओ-व्हिडीओ वाचनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

५ घणसोली-ऐरोली पाम बीच मार्गाला जोडणार

बेलापूर ते वाशी पाम बीच मार्ग प्रत्यक्षात आल्यानंतर, महापालिकेने घणसोली-ऐरोली पाम बीच मार्ग उभारण्यास सुरुवात केली होती. मात्र पर्यावरण विभागाच्या अडथळ्यामुळे हे काम लांबले. अखेर मागील वर्षात या कामातील अडचणी दूर झाल्या असून, घणसोलीला ऐरोलीशी जोडण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

६. ऐरोली अग्निशमन केंद्राला नवीन इमारत

ऐरोली अग्निशमन केंद्राच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असून काही थोडीथोडकी कामे शिल्लक आहेत. ही कामे पूर्ण होऊन, यावर्षी अग्निशमन केंद्रासाठी नवीन इमारत मिळणार आहे. सध्या आंबेडकर भवनाशेजारी कंटेनरमध्ये सुरू असलेले ऐरोली अग्निशमन केंद्र आता चांगल्या सुसज्ज इमारतीमधून सुरू होणार आहे. यासह, या ठिकाणी कर्मचारी वसाहतही उभारण्यात आली आहे. तिचेही काम पूर्ण झाले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.