Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एनएमएमटीची पनवेल-वांद्रे एसी बस बंद; ८ वर्षांवरील जुन्या वाहनांना मुंबईत प्रवेश नसल्याचे परिणाम

8

मनीषा ठाकूर -जगताप, नवी मुंबई : गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२३ या वर्षात एनएमएमटीच्या ताफ्यात एकही नवीन बस आलेली नाही. त्यामुळे अनेक प्रवासीमार्गांवर चालवण्यासाठी बसगाडी उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, एनएमएमटीच्या वतीने पनवेल ते वांद्रे या मार्गावर चालवली जाणारी वातानुकूलित बससेवा १ जानेवारीपासून बंद करण्यात आली आहे. आठ वर्षांवरील जुन्या वाहनांना मुंबईत प्रवेश नसल्याने या मार्गावरील वातानुकूलित बससेवा बंद झाली आहे. पर्यायी सुविधा म्हणून या मार्गावर परिवहनने साध्या बसगाड्या सुरू केल्या आहेत. मात्र या साध्या बसना प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे.

एनएमएमटीच्या वतीने नवी मुंबई महापालिका हद्दीसह हद्दीबाहेरही प्रवासी वाहतूकसेवा पुरवली जाते. यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण, खोपोलीसह मुंबईसारख्या शहरांचा समावेश आहे. नवी मुंबई ते वांद्रे, बोरिवली, मंत्रालय या महत्त्वाच्या मार्गांवर वातानुकूलित बससेवा चालवली जाते. त्यानुसार, गेल्या १५ वर्षांपासून एनएमएमटीकडून पनवेल-वांद्रे बससेवा दिली जात आहे. १०५ क्रमांकाचा हा मार्ग आहे. सुरुवातीला डिझेल वातानुकूलित, मग साधी, त्यानंतर इलेक्ट्रिक आणि सध्या डिझेल वातानुकूलित बसगाड्या या मार्गावर चालवल्या जातात. दिवसभरासाठी या मार्गावर सहा बसगाड्या चालवल्या जातात. त्यांच्या दिवसाला २४ फेऱ्या होत असतात.

मुंबईमध्ये सध्या आठ वर्षांवरील जुन्या बसगाड्या चालवण्यावर बंदी आहे. त्यामुळे त्यापेक्षा जुन्या बसगाड्या मुंबईतील मार्गांवर चालवता येत नाहीत. एनएमएमटीच्या वतीने, सध्या या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या, डिझेलवरील वातानुकूलित बस या आठ वर्षे जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे या बसगाड्या परिवहनला मुंबईत पाठवता येत नाहीत. यासाठी आठ वर्षांपेक्षा कमी जुन्या बसगाड्यांची गरज परिवहनला आहे. मात्र परिवहनकडे अशा बसगाड्याच नसल्याने प्रशासनाला या मार्गावर नाईलाजाने साध्या बस चालवाव्या लागत आहेत.

मागील वर्षात एकही नवीन बस दाखल नाही

सन २०२३मध्ये परिवहन विभागाच्या ताफ्यात एकही नवीन बस दाखल झालेली नाही. परिवहन विभागाकडे नवीन १०० वातानुकूलित बसगाड्या येणे अपेक्षित आहे. त्या बसगाड्यांच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू आहे. मात्र वर्षभरात या बसची खरेदी, बसबांधणी आणि बस चालवणारे कंत्राटदार यांच्यात समन्वय न झाल्याने एकही नवीन बस वर्षभरात आलेली नाही. परिणामी आता बसगाड्यांची कमतरता जाणवू लागली आहे आणि बसगाड्या नसल्याने बसमार्ग बंद करण्याची वेळ आली आहे.
मनोरंजन महागणार? मुंबई महापालिकेचा रंगभूमी करवाढीचा प्रस्ताव, तिकीट दरात होणार वाढ
हा बस मार्ग पूर्णपणे बंद करणे शक्य नाही. प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही या मार्गावर साध्या बसगाड्या सुरू केल्या आहेत. या बसगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आजही या मार्गावर पूर्वीइतक्याच दिवसाला २४ फेऱ्या होत आहेत. वातानुकूलित बसगाड्या आल्यावर या मार्गावर पुन्हा त्या सुरू केल्या जातील.- उमाकांत जंगले, तुर्भे बस आगार व्यवस्थापक, एनएमएमटी

एनएमएमटीच्या बससेवेला अल्प प्रतिसाद

पनवेल-वांद्रे मार्ग तसाही तोट्यात आहे. त्यामुळे या मार्गावर वातानुकूलित बससेवा देणे उपक्रमाला कठीण झाले होते. त्यातच आता वातानुकूलित बसगाड्यांचे आयुर्मान संपल्याने या मार्गावर साध्या डिझेलच्या बस चालवण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. याच मार्गावर बेस्टच्या साध्या सीएनजी बस चालू असून सद्यस्थितीत बेस्टचे तिकीट दर एनएमएमटीपेक्षा कमी असून बसच्या फेऱ्याही अधिक प्रमाणात आहेत. परिणामी, एनएमएमटीपेक्षा बेस्टच्या बस पूर्ण भरून जातात, तर एनएमएमटीच्या बससेवेला त्यामानाने अल्प प्रतिसाद आहे, अशी माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.