Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पक्षातील फुटीनंतर शिर्डीत प्रथमच आजपासून हे शिबीर सुरू झाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते कालच शिर्डीत दाखल झाले आहेत. मात्र, आमदार रोहित पवार आलेले नाहीत. त्यासंबंधी त्यांनी खुलासा करताना म्हटले आहे की, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही. याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये.
आम्ही सर्वजण अध्यक्ष शरद पवार आणि यांच्या सोबत आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू. यावरून गेल्यावेळच्या शिबिराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात हे शिबीर झाले होते. त्यावेळी स्वत: पवार आजारी असल्याने रुग्णालयात होते. त्यामुळे अधिवेशनाचा पहिला दिवस तत्कालीन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी गाजविला. पवार यांनी रुग्णालयातून ऑनलाइन संवाद साधला. मात्र, दुसऱ्या दिवशी रुग्णालयात सुट्टी घेत पवार थेट शिर्डीत दाखल झाले. हाताला सलाइन लावलेल्या अवस्थेत त्यांनी शिबिरात हजेरी लावत भाषण केले. मात्र, पवार येण्याआधीच अजित पवार शिबिरातून निघून गेले होते. ते कोठे आहेत, ते कोणालाच सांगता येत नव्हेत.
त्याआधी दिल्लीतील अधिवेशनातही अजितदादांच्या दांडीची चर्चा रंगली होती. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. प्रसार माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना आपली परवानगी घेऊनच अजित पवार त्यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले आहेत, असे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. अखेर अजितदादांच्या ही नाराजी पुढे काही महिन्यांतच पक्षात फूट पाडणारी ठरली.
आता पुन्हा त्याच शिर्डीत दोन दिवसांचे शिबीर होत आहे. यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे मंगळवारीच नगर जिल्ह्यात आगमन झाले. हे शिबीर निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठी आहे. पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच शिर्डीत हे शिबीर होत आहे. शिबिरात पक्षाचे अध्यक्ष पवार यांच्यासह जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक व विचारवंत, पक्षाचे जेष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये अशोक वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, डॉ. सुरेंद्र जोंधळे, श्रीमती हिना कौसर खान, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, आशिष जाधव, प्रशांत कदम, नीरज जैन यांचा समावेश आहे.
या शिबिरात आपल्या गैरहजेरीची चर्चा होऊ नये, वेगळे अर्थ काढले जाऊ नयेत, यासाठी आमदार रोहित पवार यांनी आज सकाळीच सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.