Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची बुधवारी सायंकाळी राजभवनात भेट घेतली. गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेल्या विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्त्या लवकर कराव्यात, अशी विनंती महाविकास आघाडीच्या उभयतांनी राज्यपालांनी केली. या भेटीनंतर राज्यपाल य निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेत नोंदवलेले मत, राज्यपालांनी यासंदर्भात सरकारमधून कोणी आग्रह धरीत नसल्याचे वक्तव्य या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारचे शिष्टमंडळ राजभवनवर सुमारे तासभर होते. भेट संपल्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपाल कोश्यारी यांना आम्ही राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. खान्देशात झालेला मोठा पाऊस, झालेले नुकसान, राज्यातील धरणांची परिस्थिती याबाबतही माहिती दिली.
विधान परिषेदच्या जागा रिक्त राहिल्यामुळे विधिमंडळाचे सभागृह चालवण्यात अनेक अडचणी येतात. विधानपरिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या शिफारशी करून मोठा कालखंड झाला आहे. त्यामुळे या नियुक्त्या लवकर मार्गी लावा, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांना केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना काही प्रश्न होते, त्याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच १२ सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्याबाबत मी योग्य निर्णय करतो, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यास राज्यपालांनी अवाजवी विलंब केला आहे, असे मध्यतंरी मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे. मात्र न्यायालयाच्या टिपण्णीविषयी आम्ही राज्यपाल यांच्याशी काहीही बोलणे झाले नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारमार्फत राज्यपालांना विधान परिषद सदस्यांची पाठविण्यात आलेली नावे-
काँग्रेस : सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वनकर
राष्ट्रवादी काँग्रेस : एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे
शिवसेना: उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी
‘कार्यक्रमामुळे सोयीची वेळ’
आशीर्वाद यात्रेनंतर मंत्री अनिल परब यांना नोटीस आली ही वस्तुस्थितीच आहे. पण ज्या संस्था चौकशी करत असतील त्यांना सहकार्य करणे हे आपले कामच असते. वैद्यकीय असेल वा अन्य कारणांसाठी चौकशीसाठी हजर राहण्यास सोयीची वेळ मागता येते. त्यानुसार मंत्री म्हणून परब यांचे कार्यक्रम आधीच ठरले असल्याने त्यांनी तशी पुढची वेळ मागितली असावी, असेही अजित पवार म्हणाले.