Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यातील कुख्यात गुंड मोहोळची हत्या, कातिल सिद्दीकीचा खून केल्याने देशभर चर्चेत

10

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी भरदिवसा कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनाला निघालेल्या मोहोळवर त्याच्या तीन साथीदारांनीच गोळ्या झाडल्या. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भररस्त्यात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून, टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

हल्लेखोरांच्या अंदाधुंद गोळीबारात शरद हिरामण मोहोळ (३९, रा. सुतारदरा, कोथरूड) याचा मृत्यू झाला. याबाबत त्याचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरूड) व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात अरुण धुमाळ (३२, रा. जय भवानीनगर, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे थरारनाट्य शुक्रवारी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी सुतारदरा परिसरात घडले.

या परिसरात शरद मोहोळ कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होता. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो शुक्रवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी घराबाहेर पडला. साहिल उर्फ मुन्नाही त्याच्यासोबत होता. गाडीच्या दिशेने जात असताना, मुन्ना व त्याच्या दोन साथीदारांनी मोहोळवर पिस्तुलातून तीन ते चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या मोहोळच्या शरीरात शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. आरोपींनी फिर्यादी व त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. पोलिसांच्या पथकांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Pune Crime: पुण्यात टोळीयुद्धातून म्होरक्यांचे भर रस्त्यात खून, आत्तापर्यंत कोणाकोणाचा गेम ओव्हर?
‘ससून’मध्ये कडेकोट बंदोबस्त

गोळीबारानंतर शरद मोहोळला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मोहोळचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी मोहोळच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे ससून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आर्थिक वादातून खून झाल्याचा कयास

शरद मोहोळसोबत पूर्वी काम करणारा साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर व त्याच्या दोन साथीदारांनी मोहोळची हत्या करण्यापूर्वी त्याच्यावर दहा-बारा दिवसांपासून पाळत ठेवली होती. हत्या करण्यापूर्वी साहिल उर्फ मुन्ना सकाळपासून मोहोळसोबतच होता. आर्थिक किंवा जमीन व्यवहाराच्या वादातून ही घटना घडल्याचा कयास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

कातिल सिद्दीकीचा खून केल्याने देशभर चर्चेत

शरद मोहोळवर खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुंड संदीप मोहोळ याचा तो विश्वासू साथीदार होता. टोळीयुद्धातून शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांनी निलायम चित्रपटगृह परिसरातील एका हॉटेलमध्ये प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारणे याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या केली होती. या प्रकरणात त्याला अटक झाली होती, तसेच जामीनही झाला होता. त्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या वेळेस दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये नाडीने गळा आवळून खून केल्याच्या आरोपामुळे शरद मोहोळचे नाव देशभरात गाजले. मात्र, सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर मोहोळ राजकारणात सक्रिय झाला. त्याच्या पत्नीने भारतीय जनता पक्षात प्रवेश करत सुतारदरा परिसरात पक्षाचे काम सुरू केले होते.

Sharad Mohol: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या, कोथरुडमध्ये भरदिवसा गोळीबार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.