Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागपुरातील आईस फॅक्टरीत स्फोट; अमोनिया वायूच्या गळतीमुळे टाकी फुटली, तीन कामगार जखमी

6

नागपूर: कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उप्पलवाडी येथील बालाजी आइस फॅक्टरीत स्फोट झाल्याने तीन श्रमिक जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. दोन श्रमिकांना मेयोत दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कपिलनगर पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फॅक्टरी विजय जुगलकिशोर शाहू यांच्या मालकीची असून, गेल्या जूनपासून उत्पादन बंद आहे. सुमारे पाच हजार चौरस फुटात असलेल्या फॅक्टरीच्या पहिल्या माळ्यावर श्रमिक राहतात. तर तळ मजल्यावर उत्पादन घेण्यासाठी मशिन्स लावण्यात आल्या आहेत. आठवड्यातून दोन दिवस ही फॅक्टरी काही तास सुरू करण्यात येते.

विजय हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असून त्यांचा पुतण्या अजय शाहू हे फॅक्टरीचे काम बघत आहेत. शनिवारी सायंकाळी तीन श्रमिक फॅक्टरीत सफाई करत होते. अमोनिया वायूची गळती झाली. त्यामुळे अमोनिया जमा होणाऱ्या टाकीत स्फोट झाला. यात तीन कामगार जखमी झाले. त्यापैकी एकाच्या मनगटाला दुखापत झाली. दुसरा अमोनिया वायूमुळे बेशुद्ध झाला. माहिती मिळताच कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्यासह पोलिस व अग्निशमन विभागाचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दोन जखमींना लगेचच मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून, वृत्त लिहिपर्यंत जखमींची नावे कळू शकलेली नाहीत. टाकीत सुमारे एक हजार किलो अमोनिया असून तो परिसरात पसरला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
धावत्या स्कूल व्हॅनच्या चालकाला हार्ट अटॅक, मुलं घाबरली; भीतीपोटी रडू-ओरडू लागली, तितक्यात..
अग्निशमन विभाग अलर्टवर
उप्पलवाडी येथील बालाजी आइस फॅक्टरीत स्फोट होताच कळमना आणि सुगतनगर येथील अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले. तीन जखमी बाहेर काढण्यात आले असले तरी परिसरात कोणी अडकले तर नाही ना, याचा शोध अग्निशमन विभागाकडून घेण्यात येत आहे. अमोनिया गॅस १०० ते १५० चौरस फूट परिसरात पसरला असल्याने या परिसरातील उद्योगातील नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी तैनात आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी यंत्रणा अलर्टवर असल्याचे मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी भीमराव चंदनखेडे आणि एनएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश खरटमल यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.