Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिंदेंच्या शिवसेनेतील उमेदवार लोकसभेला भाजपच्या तिकिटावर लढणार का, असा प्रश्न केसरकरांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी पालघर लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं. पालघरमध्ये भाजपनं आमच्यासाठी जागा सोडली आणि तिथे उमेदवारही दिला. एखाद्या जागेवर भाजपचा क्लेम असेल आणि आमचा उमेदवार पसंत असेल तर उमेदवारांची अदलाबदली होऊ शकेल, असं केसरकर म्हणाले.
पालघरमध्ये काय घडलेलं?
२०१४ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर चिंतामण वनगा विजयी झाले. २०१८ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांचा मुलगा चिंतामण वनगानं शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं या जागेवर दावा सांगितला. चिंतामण वनगा यांना तिकिट देण्याची मागणी केली. पण जागा भाजपची होती. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपनं राजेंद्र गावित यांना निवडून आलं. २०१९ च्या लोकसभेआधी जागावाटप झालं. भाजपनं पालघर मतदारसंघ शिवसेनेला दिला. या ठिकाणी गावितच उमेदवार होते. पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात काय घडतंय?
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत ठाकरे गटात आहेत. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे राहिला आहे. शिंदे गटात असलेले मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. सध्या भाजप असलेले निलेश राणे २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर इथून विजय मिळवला होता. आता ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे भाजपदेखील या मतदारसंघावर दावा करू शकतो.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील हालचालींवर केसरकर यांनी सविस्तर भाष्य केलं. युती म्हणून आम्ही ठामपणे एकत्र आहोत. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्याला बांधील आहोत. निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे किरण सामंत यांनी जर तयारी सुरू केली असेल तर ती चुकीची आहे असं मला वाटत नाही. आमचे पूर्वीचे खासदार (निलेश राणे) कुडाळमधून आमदारकीची तयारी करत आहेत. त्यामुळे खासदारकीची ही जागा रिक्त आहे. ही जागा कायम शिवसेनेकडे राहिली आहे. त्यामुळे किरण सामंतांना ही जागा मिळाली तर ती परंपरा कायम राहील, असं केसरकर म्हणाले.
केसरकर यांनी त्यांचे एकेकाळचे राजकीय शत्रू असलेल्या नारायण राणे यांचाही उल्लेख केला. राणेसाहेब जेष्ठ आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय या जागेचा निर्णय होणार नाही. मला खात्री आहे की, जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी राणेंचे आशीर्वाद असतील आणि आम्ही सर्वजण त्याला निवडून आणू, असा विश्वास केसरकर यांनी बोलून दाखवला.