Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- दहावीत शिकता-शिकता केला ई-सायकलचा भन्नाट प्रयोग
- जुन्या सायकलला बँटरी जोडून ई सायकलचा यशस्वी प्रयोग
- गावखेड्यातल्या माणसांचा प्रवास सुसाह्य करणारी सायकल सर्वांच्या चर्चेचा विषय
सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) च्या दहावीत शिकणाऱ्या एका अवलीया विद्यार्थ्यानं गावाकडच्या माणसांचे खर्च आणि कष्ट कमी करणारी सायकल बनवली आहे. शेळगांव (आर) येथील हेमुजी चंदेले महविदयालयात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या संकेत परमेश्वर गायकवाड यानं आपल्याजवळच्या जुन्या सायकलला बँटरी जोडून ई सायकलचा यशस्वी प्रयोग केला आहे.
मुलाला आणि त्याच्या वडिलांना घरापासून शेतात जायचे म्हटले की, किमान पंधरा ते सोळा किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. ऑनलाईन शिक्षणामुळे तिथे जायला अडचणी यायच्या. शिवाय संकेतला शेतावर नेण्यासाठी वडिलांचा सारखा तगादा असायचा. मग अभ्यास करून शेताकडे जाणं व्हायचं पण धावपळ प्रचंड व्हायची. अशातच संकेतनं एकदा धावपळीत शेजारून जाणारी इलेक्ट्रिक बाईक पाहिली.
दुचाकी इलेक्ट्रिक गाडी घ्यायची परिस्थिती तर नाही मग करायचं काय ? असा प्रश्न पडलेल्या संकेतनं जर आपल्याकडे आहे त्या सायकललाच इलेक्ट्रिक सायकल बनवली तर आणि त्यातून सुरू झाला इलेक्ट्रिक सायकल निर्मितीचा प्रवास… सुरुवातीला कशाचीही माहिती नव्हती. हळूहळू ज्या माध्यमातून माहिती मिळेल त्या माध्यमातून माहिती उपलब्ध करत प्रयोग सुरू केला. यासाठी जुन्या दोन सायकली खराब झाल्या. मात्र, तिसऱ्या जुन्या सायकलीने आधार देत प्रयोग प्रत्यक्षात उतरला.
अर्धा एचपीची मोटार, जुन्या पाठीवरील पंपाच्या चोवीस वॅटच्या दोन बॅटऱ्या, लाईट, हॉर्न आणि कंट्रोलर वापरुन जुनी सायकल रस्त्यावर तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नातून धावू लागली. दोन तास चार्ज केल्यानंतर सुमारे २५ किलोमीटरपर्यंत ही सायकल धावत असून सायकल चालू असताना पायडल मारण्याची गरज नाही. बॅटरी संपल्यानंतर पायडल वापर करू शकतो. त्यामुळे आता संपूर्ण पंचक्रोषीत संकेत आणि गावखेड्यातल्या माणसांचा प्रवास सुसाह्य करणारी सायकल हे सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
संकेतच्या या शोधबुद्धीला चालना देण्यासाठी शेळगाव ग्रामपंचायत शेळगाव (आर) यांच्यावतीने सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या हस्ते प्रोत्साहनपर ५००० रूपयाचं बक्षीसही देण्यात आलं आहे.