Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune PMP Bus: २०२३मध्ये पीएमपी मालामाल; प्रवासी तिकीट-पासमधून कोटींची कमाई

10

पुणे : दर वर्षी संचलन तूट वाढत असलेल्या ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) सरत्या वर्षात (२०२३) थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी ‘पीएमपी’ला प्रवासी तिकीट आणि पासमधून ६०९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये प्रवासी उत्पन्नात ८५ कोटी रुपयांनी वाढ झाली. उपलब्ध बस आणि मनुष्यबळाच्या योग्य नियोजनामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

बकोरियांची कारकिर्द लाभदायी

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ‘पीएमपी’कडून साधारण १७५० बसद्वारे सेवा दिली जाते. त्यातून दररोज साधारणत ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. ‘पीएमपी’च्या ताफ्यात २०८९ बस असून, पैकी १७५० बस मार्गावर सोडल्या जातात. २०२२च्या पहिल्या काही महिन्यांत ‘पीएमपी’चे दरमहा उत्पन्न ४० कोटी रुपयांहून कमी होते. ‘पीएमपी’चे अध्यक्ष म्हणून ओमप्रकाश बकोरिया यांनी पदभार घेतल्यानंतर विविध उपाययोजना करून उत्पन्नाबरोबरच चांगली प्रवासी सेवा देण्यावर भर दिला.

दरमहा उत्पन्न ~ ५५ कोटींवर

तत्कालीन अध्यक्ष बकोरिया यांच्यामुळे दरमहा ~ ४० कोटींच्या आसपास असलेले उत्पन्न डिसेंबर २०२२पर्यंत ५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षीच्या (२०२३) पहिल्या काही महिन्यांत विविध उपाययोजना राबवून उत्पन्नवाढीबरोबरच खर्च कमी करण्यावर भर दिला. गर्दी कमी असलेल्या मार्गांवरील बसची संख्या कमी करून गर्दी असलेल्या मार्गांवरील बस वाढविल्या. त्यानंतरचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून उत्पन्नाचा आकडा ~ ५५ कोटींपर्यंत नेला. त्यामुळे २०२३मध्ये प्रवासी तिकीट आणि पासमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली. गेल्या वर्षात दरमहा सरासरी ५० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले. २०२२ मध्ये अकराशे कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला होता. त्या वर्षी एकूण ५२६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले, तर ५९० कोटी रुपये संचलन तूट होती. २०२३ मध्ये पीएमपीचे उत्पन्न वाढल्याने संचलन तुट कमी होण्यास मदत होणार आहे.
मोनोची कमाईसाठी धडपड; तिकीटविक्रीव्यतिरिक्त महसूल वाढविण्यासाठी MMRDAने कंबर कसली
‘सीएनजी’वरील १०० बसची खरेदी लवकरच

चांगली प्रवासी सेवा देण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी नवीन बसची आवश्यकता आहे. ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या बसची संख्या खूपच कमी झाल्यामुळे नव्याने ‘सीएनजी’वरील १०० बस खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसांमध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नवीन बस आल्यानंतर ‘पीएमपी’च्या तिजोरीत मोठी भर पडण्याची शक्यता आहे.

~ ५२६ कोटी
सन २०२२मधील उत्पन्न

~ ६०९ कोटी
२०२३मधील उत्पन्न

१७१०
गेल्या वर्षी मार्गांवरील सरासरी बस

एक कोटी ६९ लाख
गेल्या वर्षीचे सरासरी प्रतिदिन उत्पन्न

पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या जुन्या योजना यापुढेही कायम सुरू राहतील. गर्दी जास्त असलेल्या मार्गांवर बस वाढविल्या जातील. त्याबरोबरच तिकिटांव्यतिरिक्त उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये जाहिरात, बसथांबे आणि ‘पीएमपी’च्या काही इमारती भाड्याने देण्याचे काम सुरू आहे.-डॉ. संजय कोलते, अध्यक्ष, पीएमपी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.