Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणच्या वरप येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी पवार यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा वाचाळवीर असा उल्लेख करताना आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ‘कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. मी लाभासाठी नव्हे, तर बहुजनाच्या कल्याणासाठी सरकारमध्ये सहभागी झालो आहे’, असे पवार यांनी नमूद केले. कल्याण जिल्हा घोषित करण्याची मागणी सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी, ग्रामीण भागातील ७० ग्रामपंचायतींचे वेगाने नागरीकरण होत असल्याने याची स्वतंत्र नगरपरिषद घोषित करण्याची मागणी केली. उल्हासनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवून आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे संकेत दिले.
‘मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुंडगिरीत वाढ’
‘ठाणे जिल्ह्यात गुंडगिरी वाढत आहे. पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम करावे, गुंडगिरी आवरावी’ असे आदेश उपमुख्यमंत्री या नात्याने देत असल्याचे अजित पवार यांनी भाषणात नमूद केले. यामुळे मुख्यमंत्र्यांना एकप्रकारे पवार यांनी घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू झाली.
कल्याणमध्ये शक्तिप्रदर्शन
रस्त्याच्या कडेला उभ्या बुलडोझरमधून पुष्पवृष्टी, क्रेनवर लटकणारे हार, जागोजागी कार्यकर्त्यांची गर्दी आणि समर्थकांच्या गराड्यातून अजित पवार यांनी कल्याण शहरात शक्तिप्रदर्शन केले. ठाण्याच्या ग्रामीण भागातून यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा ताफा कल्याणमध्ये दाखल झाला होता.