Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ठाण्यात क्रीडा स्पर्धांमधून ‘राजकीय फटकेबाजी’; बड्या नेत्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही ब्रॅण्डिंग

8

ठाणे : मुख्यमंत्री चषक…नमो चषक महोत्सव…केंद्रीय राज्यमंत्री चषक…धर्मवीर आनंद दिघे चषक…नजीब मुल्ला ट्रॉफी या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून आयोजित केलेल्या क्रीडा चषक आणि स्पर्धांची ठाणे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःसह पक्षाची ओळख जनमानसात रुजवण्यासाठी या स्पर्धांमधून ‘राजकीय फटकेबाजी’ केली जात आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या बड्या
नेत्यांसोबत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे ब्रॅण्डिंग होतेच. मात्र या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या संघांना मोठमोठ्या रकमांची आकर्षक बक्षिसे आणि जिल्हास्तरीय व्यासपीठावर चमकण्याची नामी संधी मिळत आहे.

आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तर त्यानंतर विधानसभा निवडणूकांचीही धामधूम सुरु होणार आहे. पक्षांची फाटाफूट आणि नव्या राजकीय समीकरणानंतर आपण नेमका कोणता ‘झेंडा’ हाती घेतला आहे, हे दाखवून देण्याची नामी संधी या स्पर्धांमधून राजकीय नेते मंडळींना मिळाली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात ठाण्यात झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक
कबड्डी स्पर्धेतून खेळाच्या मैदानातून ‘राजकीय धुरळा’ उडण्यास प्रारंभ झाला. या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादीमधून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केले होते. मात्र नव्या वर्षाच्या सुरवातीपासूनच खऱ्या अर्थाने या स्पर्धांच्या आयोजनाची जोरदार फटकेबाजी शहरात सुरु झाली. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत धर्मवीर आनंद दिघे चषक २०२४ या न्यू जरी मरी क्रिकेट क्लब, काबाड आळी मित्र मंडळ व जरी मरी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेने ‘पहिला क्रमांक’ गाठला. तीन दिवस आर्य क्रिडा मंडळ (शक्ती स्थळ) पटांगणावर रंगलेल्या या स्पर्धेचे शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजडे व नितेश पाटोळे यांनी आयोजन केले होते. याच स्पर्धेत कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची मैदानातील फटकेबाजी क्रीडा रसिकांना अनुभवता आली. दरम्यान, आगामी काळात युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून संस्कृती कला, क्रीडा महोत्सव शहरात होणार असून दरवर्षीप्रमाणे दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या वतीने आयोजित होणारी ठाणे प्रीमिअर लीग अर्थात मुख्यमंत्रीही रंगणार आहे.

भाजपही आघाडीवर

ठाण्यात १२ जानेवारीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ‘नमो चषक महोत्सव’ सुरु होणार आहे. हा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव होणार असून विजेत्यांना नमो चषक दिला जाणार असल्याचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, १०० आणि ४०० मिटर धावणे, फुटबॉल, बॅडमिंटन आदी खेळांच्या स्पर्धा होणार असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेतल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री चषक’ या स्पर्धेच्या धर्तीवर ‘नमो चषक’ होत असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भिवंडीत २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कपिल यांच्या समर्थकांकडून ‘केंद्रीय राज्य मंत्री चषक’ आयोजित करण्यात आला आहे.
शिवसेनेची तोफ धडाडणार; नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत २३ जानेवारीला जाहीर सभा
मालिकावीराला चारचाकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या माध्यमातून दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये १८ ते २१ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘नजीब मुल्ला ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेच्या मालिकावीराला चारचाकी गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. तसेच विजेत्यांना दहा लाख, उप विजेत्यांना पाच लाख व उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजांना प्रत्येकी २५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच ‘केंद्रीय राज्य मंत्री चषक’ क्रिकेट
स्पर्धेतही विजेत्या संघास तीन लाख व उप विजेत्या संघाला दीड लाखांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.

आर्थिक गणितांची गोळाबेरीज

स्पर्धांसाठी प्रायोजक, होर्डिंग, बॅनर, कमानींमधून लाखोंची उलाढाल होते. यासोबतच स्पर्धेतील सहभागी संघांचे टीशर्ट, चहा, नाश्ता, जेवण, मैदानाचा खर्च, स्टेज, समालोचक, साउंड, लाईट्स यांच्या आर्थिक खर्चाची गोळाबेरीज आयोजकांना करावी लागते. तर स्पर्धांना सेलिब्रिटी बोलवणे, या सामन्यांचे सोशल मीडियावरून लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी यंत्रणा उभी करणे अशा बाबींकरिता आयोजकांना आर्थिक गणिते जुळवावी लागतात. त्यातून या सामन्यांच्या शुभारंभ आणि समारोपासाठी बडे नेते दाखल झाल्यास ‘राजकीय गणित’ आपोआप जुळून येते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.